२०२२ महिला क्रिकेट विश्वचषक

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

२०२२ महिला क्रिकेट विश्वचषक ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीद्वारे सुरू केलेल्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची बारावी आवृत्ती ४ मार्च ते ३ एप्रिल २०२२ दरम्यान न्यू झीलंडमध्ये झाली. न्यू झीलंडमध्ये महिला क्रिकेट विश्वचषक आयोजित करण्याची ही तिसरी वेळ होती. यापूर्वी १९८२ आणि २००० साली न्यू झीलंडमध्ये विश्वचषक झाला होता. मूलत: स्पर्धा ६ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२१ दरम्यान आयोजित केली जाणार होती परंतु कोव्हिड-१९ रोगाच्या फैलावामुळे स्पर्धा १ वर्ष पुढे ढकलण्यात आली. यजमान न्यू झीलंडसह ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज या आठ देशांनी सदर विश्वचषकात सहभाग घेतला. पैकी बांगलादेशने महिला विश्वचषक पदार्पण केले.

न्यू झीलंड संघ स्पर्धेचा यजमान म्हणून आपोआप पात्र ठरला. मूलत: २०१७-२० आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेमधून आणखी तीन संघ पात्र ठरतील असे ठरले असताना ऑक्टोबर २०१८ मध्ये हा निर्णय बदलला गेला आणि सर्वोत्तम ४ संघ + स्पर्धेचा यजमान अस ठरवलं गेल. २०२१ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रतामधून आणखी ३ संघ मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरणार होते. १२ मे २०२० रोजी आयसीसीने कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे पात्रता स्पर्धा जी ३-१४ जुलै २०२० दरम्यान श्रीलंकेत होणार होती ती अनिश्चित काळाकरता पुढे ढकलण्यात येत असल्याची घोषणा केली. पात्रता स्पर्धा नोव्हेंबर २०२१ मध्ये झिम्बाब्वेमध्ये हलवण्यात आली. परंतु पुन्हा एकदा कोव्हिड-१९ पसरल्यामुळे पात्रता स्पर्धा अर्ध्यातूनच रद्द करावी लागली. महिला एकदिवसीय क्रमवारीनुसार विश्वचषकातील शेष तीन जागा भरवल्या गेल्या.

ऑस्ट्रेलियाने पहिले ६ सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली. पाठोपाठ पहिल्या ६ सामन्यांमध्ये ४ विजयांसह दक्षिण आफ्रिका देखील उपांत्य फेरीस पात्र ठरला. इंग्लंडने शेवटच्या सामन्यात बांगलादेशला हरवत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. गट फेरीच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या भारतावरील विजयामुळे ७ गुणांसह वेस्ट इंडीज चौथे स्थान पटकावत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला. अंतिम सामन्यात अलिसा हीलीच्या १७० धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ७१ धावांनी पराभव करत सातव्यांदा महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला. ऑस्ट्रेलियाच्याच अलिसा हीलीला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. तिने स्पर्धेतील सर्वाधिक ५०९ धावा केल्या. तर २१ बळी घेऊन इंग्लंडची सोफी एसलस्टोन ही स्पर्धेत आघाडीची गोलंदाज ठरली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →