१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०२२ ही १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील १४वी आवृत्ती १४ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२२ दरम्यान अँटिगा आणि बार्बुडा, गयाना, सेंट किट्स आणि नेव्हिस आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो या चार देशात खेळविली गेली. सदर आवृत्तीत १६ देशांच्या १९ वर्षांखालील राष्ट्रीय क्रिकेट संघांनी सहभाग घेतला. सदर स्पर्धा एकदिवसीय सामना पद्धतीने खेळविली गेली. १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन हे पहिल्यांदाच कॅरेबियन बेटांवर करण्यात आले. स्पर्धेपूर्वी कोव्हिड-१९ या रोगाच्या विलगीकरण्याच्या क्लिष्ट नियमांमुळे न्यू झीलंडने स्पर्धेतून माघार घेतली. न्यू झीलंडच्या जागी स्कॉटलंडने विश्वचषकात सहभाग घेतला. बांगलादेश संघ गतविजेता आहेत.
स्पर्धेच्या मध्यात भारतीय गोटामध्ये कोव्हिड-१९ पसरला गेल्याने स्पर्धेचे भवितव्य धोक्यात आले होते. भारताचा कर्णधार आणि उपकर्णधारसहित इतर चार खेळाडूंना आयर्लंडविरुद्धच्या सामन्याआधी कोरोना झाल्याचे निदर्शनास आले. परंतु कोरोना संक्रमण झालेल्या खेळाडूंचे त्वरित विलगीकरण केल्याने पुढील धोका टळल्याने कोणतेही सामने स्थगित करावे लागले नाही.
इंग्लंड अंतिम सामन्यात पोचणारा पहिला संघ ठरला. इंग्लंडने पहिल्या उपांत्य सामन्यामध्ये अफगाणिस्तानचा १५ धावांनी पराभव केला. इंग्लंडने तब्बल २४ वर्षांनंतर १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि सलग चौथ्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. भारताने अंतिम सामन्यात ४ गडी राखून विजय मिळवत पाचव्यांदा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक जिंकला.
१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०२२
या विषयावर तज्ञ बना.