२०२१ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता ही एक महिला क्रिकेट स्पर्धा होती जी झिम्बाब्वेमध्ये २१ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२१ दरम्यान खेळविली गेली. इसवी सन २०२२ मध्ये न्यू झीलंडमध्ये होणाऱ्या २०२२ महिला क्रिकेट विश्वचषकच्या पात्रता प्रक्रियेमधील ही स्पर्धा शेवटची पायरी होती. महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेची ही पाचवी तर झिम्बाब्वेमध्ये झालेली ही पहिलीच आवृत्ती होती. एकूण १० संघांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला. मुख्य पात्रता स्पर्धेसाठी पात्रता ठरविण्याऱ्या सर्व खंडीय स्पर्धा या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० प्रकारामध्ये खेळविण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धेतील सामने हे ५० षटकांचे होते. पात्रता स्पर्धेमधील अव्वल तीन संघ विश्वचषकास पात्र ठरतील तर चौथ्या आणि पाचव्या स्थानावर असलेले संघ हे आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेच्या पुढील आवृत्तीसाठी अव्वल तीन संघांसह पात्र ठरतील असे आयसीसीने जाहीर केले. या स्पर्धेमधील थायलंड, नेदरलँड्स आणि अमेरिका हे संघ असलेले सामने सोडून इतर सर्व सामन्यांना महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा होता.
मूलत: पात्रता स्पर्धा ३ ते १९ जुलै २०२० दरम्यान श्रीलंकेमध्ये होणार होती. परंतु कोव्हिड-१९ रोग फैलावल्यामुळे मार्च २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने वैश्विक टाळेबंदीमुळे आणि बिकट परिस्थिती बघून स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा केली. सरतेशेवटी ऑगस्ट २०२१ मध्ये स्पर्धा झिम्बाब्वे मध्ये नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ दरम्यान खेळविली जाईल असे आयसीसीने जाहीर केले. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात आयसीसीने वेळापत्रक जारी केले. दहा संघांना पाच संघांच्या दोन गटात विभागले गेले. प्रत्येक गटातून अव्वल तीन संघांनी सुपर ६ फेरीमध्ये प्रगती केली. सुपर ६ फेरीमधून अव्वल तीन संघ २०२२ महिला क्रिकेट विश्वचषक आणि आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेच्या पुढील आवृत्तीसाठी पात्र ठरले. तर चौथ्या आणि पाचव्या स्थानावर असलेले संघ केवळ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेच्या पुढील आवृत्तीसाठी पात्र ठरले.
८ नोव्हेंबर २०२१ रोजी अनेक खेळाडूंना कोव्हिड-१९ झाल्यामुळे पापुआ न्यू गिनीने स्पर्धेतून माघार घेतली. १० नोव्हेंबर रोजी, आयसीसीनेपापुआ न्यू गिनीसाठी बदली संघ न घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे अ गटातील संघांची संख्या पाच वरून चारवर करण्यात आली. नोव्हेंबर अखेरीस दक्षिण आफ्रिकी देशांमध्ये कोव्हिड-१९चा वेगळ्या प्रकारचा विषाणूचा फैलाव सुरू झाल्याने स्पर्धेचे भवितव्य धोक्यात आले. क्रिकेट आयर्लंडने परिस्थितीचा आढावा घेत असल्याची घोषणा केली. तत्पूर्वी श्रीलंकेच्या तीन खेळाडूंना कोव्हिड-१९ची लागण झाल्याने वेस्ट इंडीजविरुद्धचा श्रीलंकेचा नियोजित सामना रद्द करावा लागला.
त्याच दिवशी उशीरा आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने जाहीर केले की झिम्बाब्वेमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उर्वरीत पात्रता स्पर्धा रद्द करण्यात आली. आयसीसीच्या खेळ नियमांनुसार महिला वनडे क्रमवारीमुसार बांगलादेश, पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज हे तीन देश २०२२ महिला क्रिकेट विश्वचषक तर श्रीलंका आणि आयर्लंड हे दोन देश विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या तीन देशांबरोबर २०२२-२५ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा साठी पात्र ठरले.
२०२१ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.