२०२१ आयसीसी पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

२०२१ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक ही क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने प्रकारातल्या आयसीसी ट्वेंटी२० विश्वचषकातली सातवी आवृत्ती आहे. सदर स्पर्धा संयुक्त अरब अमिराती आणि ओमान या दोन देशांमध्ये १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०२१ दरम्यान खेळवली जाईल. या स्पर्धेत अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, आयर्लंड, भारत, नामिबिया, नेदरलँड्स, न्यू झीलँड, ओमान, पाकिस्तान, पापुआ न्यू गिनी, स्कॉटलंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज हे सोळा देश भाग घेतील. यांपैकी नामिबिया आणि पापुआ न्यू गिनी या दोन देशांनी ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पदार्पण केले. मागील स्पर्धेचे विजेते वेस्ट इंडीज होते.

स्पर्धेची ही आवृत्ती मूलतः २०२० मध्ये ऑस्ट्रेलिया खेळली जाणार होती. २०२० आणि २०२१ असे लागोपाठ दोन ट्वेंटी२० विश्वचषकांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु जुलै २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने विश्वभर फैलावला गेलेला कोरोनाव्हायरस या साथरोगाच्या संक्रमणामुळे २०२०चा विश्वचषक दोन वर्षांनी पुढे ढकलला. त्यामुळे भारतात २०२२ साली होणारा विश्वचषक २०२१ साली होईल आणि २०२० साली ऑस्ट्रेलियात होणारा विश्वचषक २०२२ साली होईल असे जाहीर झाले. पण भारतामध्ये मे २०२१ दरम्यान कोरोनाव्हायरसची दुसरी लाट आल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने विश्वचषक भारतातून संयुक्त अरब अमिराती आणि ओमान स्थानांतरित केल्याची घोषणा ऑगस्ट २०२१ मध्ये केली. दोन दिवसांनंतर मैदाने आणि सामन्यांचे वेळापत्रक जारी करण्यात आले.

१५ ऑगस्ट २०२१ रोजी तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर हल्ला चढवून शहर व देश ताब्यात घेतल्यानंतर अस्थिर झालेल्या राजकीय परिस्थितीमुळे विश्वचषकात अफगाणिस्तानच्या सहभागाबद्दल शंका निर्माण झाल्या. परंतु राजकीय परिस्थिती कशीही असली तरी विश्वचषकात अफगाणिस्तान सहभाग घेणार असल्याचे अफगाण क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले. अफगाणिस्तानचा माजी कर्णधार असघर अफगाण आणि वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो या दोघांनी विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

उपांत्य फेरीसाठी सुपर १२ च्या अ गटामधून ऑस्ट्रेलिया, इंग्लंड तर ब गटामधून पाकिस्तान आणि न्यू झीलंड हे संघ पात्र ठरले. पहिल्या उपांत्य सामन्यात इंग्लंडचा ५ गडी राखून पराभव करत न्यू झीलंड अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानचा पराभव करीत ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. रोमहर्षक झालेल्या अंतिम सामन्यात न्यू झीलंडचा ८ गडी राखून विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पहिल्यांदा जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. पाकिस्तानचा बाबर आझम याने सर्वाधिक ३०३ धावा केल्या तर श्रीलंकेचा वनिंदु हसरंगा याने सर्वाधिक १६ गडी बाद करत विश्वचषकात आघाडीचा गोलंदाज ठरला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →