२०२१ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा ही एक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा ६-१२ जून २०२१ दरम्यान रवांडामध्ये आयोजित केली गेली होती. सन १९९४ मध्ये तुत्सीविरोधात झालेल्या नरसंहाराच्या पीडितांच्या स्मरणार्थ सन २०१४ मध्ये प्रथम आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक क्विबुका स्पर्धेची ही सातवी आवृत्ती आहे. सर्व सामने किगाली मधील गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आले. मागील स्पर्धेचे विजेते टांझानियाने या वेळेस स्पर्धेत भाग घेतला नाही.
यजमान रवांडासह केन्या, नामिबिया, नायजेरिया आणि बोत्स्वाना या पाच देशांनी भाग घेतला. योजनेनुसार युगांडाचा संघ सुद्धा यावेळेस स्पर्धेत भाग घेणार होता परंतु युगांडामध्ये कोरोना रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्याने युगांडाने स्पर्धेतून माघार घेतली. नामिबिया, नायजेरिया आणि बोत्स्वाना या देशांनी प्रथमच या स्पर्धेत भाग घेतला.
१२ जून २०२१ रोजी झालेल्या अंतिम सामन्यात साराह वेटोटोच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर केन्याने नामिबियावर ७ गडी राखत विजय मिळवत क्विबुका चषक चौथ्यांदा जिंकला. तर यजमान रवांडाने नायजेरियाला हरवत तिसरे स्थान पटकावले. नामिबियाच्या सुने विट्ट्मन हिने स्पर्धेत सर्वाधिक १६७ धावा केल्या. केन्याच्या साराह वेटोटो हिने स्पर्धेत सर्वाधिक १७ गडी बाद केले.
२०२१ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा
या विषयातील रहस्ये उलगडा.