२०१६-१७ रणजी करंडक ही भारतातील एक मुख्य प्रथम श्रेणी स्पर्धा रणजी करंडक स्पर्धेची ८३ आवृत्ती होती. मागील हंगामांपेक्षा वेगळ्या पद्धतीने २०१६-१७ची स्पर्धा ही तटस्थ ठिकाणांवर खेळवली गेली. कर्णधार आणि प्रशिक्षकांनी ह्या बदलास पाठिंबा दिला. सदर स्पर्धेत पदार्पण करणारा छत्तीसगड क्रिकेट संघ हा रणजी करंडक स्पर्धेत भाग घेणारा २८वा संघ होता. मुंबईचा संघ हा गतविजेता होता. अंतिम सामन्यात गुजरातने मुंबईला ५ गडी राखून पराभूत करत पहिल्यांदाच विजेतेपद मिळवले.
सप्टेंबर २०१६ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्पर्धेच्या तारखा, गट आणि वेळापत्रक जाहीर केले. दिवस/रात्र कसोटी क्रिकेट खेळवण्यासंदर्भात निर्णय घेण्यास मदत व्हावी ह्या हेतूने स्पर्धेत यावेळी गुलाबी चेंडू वापरण्यात आला.
ऑक्टोबर २०१६ मध्ये, गट बच्या महाराष्ट्र आणि दिल्ली दरम्यानच्या सामन्यात, महाराष्ट्रातर्फे खेळताना स्वप्निल गुगले आणि अंकित बावने यांनी रणजी स्पर्धेत ५९४ धावांची विक्रमी भागीदारी केली. प्रथम-श्रेणी क्रिकेट मधील ही दुसरी सर्वोत्तम भागीदारी होती.
गट अ मधील गुजरात विरुद्ध बंगाल आणि गट क मधील हैदराबाद विरुद्ध त्रिपुरा हे सामने धुरक्यामुळे रद्द करण्यात आले. बीसीसीआयने सुरुवातीला, गट फेरी संपल्यानंतर ह्या सामन्यांचे आयोजन केले होते. ह्या सामन्यांना तारखा उपलब्ध करून देण्यासाठी, बाद फेरीतील सामने पुढे ढकलण्यात आले होते. मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आणि तमिळनाडू क्रिकेट असोसिएशन (टीएनसीए) या दोघांनी वेळापत्रकात बदल करण्यास विरोध केला. एमसीएचे सह-सचिव उन्मेश खानविलकर म्हणाले की "ह्यामुळे बाद फेरीसाठी पात्र होण्यास सहभागी संघांना अयोग्य असा फायदा मिळेल". टीएनसीएचे सचिव कासी विश्वनाथन, ह्यांनी म्हणले "सामन्यांच्या तारखा बदलू नयेत आणि गुण विभागून देण्यात यावेत ". ह्या नंतर बीसीसीआयने सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार केला. डिसेंबर २०१६ मध्ये, बदलांचा निर्णय रद्द करण्यात आला आणि रद्द झालेल्या सामन्यांसाठी प्रत्येक संघाला प्रत्येकी १ गुण देण्यात आला.
अ गटातून मुंबई, गुजरात आणि तमिळनाडू, ब गटातून झारखंड, कर्नाटक आणि ओरिसा आणि क गटातून हैदराबाद आणि हरयाणा हे संघ स्पर्धेच्या बाद फेरीसाठी पात्र होऊ शकले उपांत्यपूर्व फेरीच्या तारखा एका दिवसाने आणि उपांत्य सामन्यांच्या तारखा दोन दिवसाने मागे गेल्या. इंदूरमधील होळकर मैदानावर अंतिम सामना आधी ठरल्यापेक्षा दोन दिवस अगोदार १० जानेवारी २०१६ रोजी खेळवण्यात आला.
उपांत्य सामन्यात गुजरातने झारखंडला १२३ धावांनी पराभूत करून रणजी करंडक इतिहासात १९५०-५१ नंतर दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश केला. दुसरीकडे मुंबईने तमिळनाडूला ६ गडी राखून पराभूत करून ४६व्यांदा रणजी करंडक अंतिम सामन्यात धडक मारली.
२०१६-१७ रणजी करंडक
यामागील विज्ञान आणि इतिहास.