ज्या दीर्घिकांचा आकार चपटा, फिरणाऱ्या तबकडी सारखा असतो, ज्यामध्ये तारे, वायू आणि धूळ असते, केंद्रभागी अनेक ताऱ्यांच्या केंद्रीकरणाने तयार झालेला तेजोगोल व त्याच्याभोवती सर्पिलाकार फाटे दिसतात अशा दीर्घिकांना सर्पिलाकार दीर्घिका (इंग्रजी: Spiral Galaxy - स्पायरल गॅलॅक्सी) म्हणतात. या दीर्घिका एडविन हबलने इ.स. १९३६ साली त्याच्या द रेल्म ऑफ द नेब्यूला या कामामध्ये वर्णन केलेल्या दीर्घिकांच्या संरचनेवर आधारित तीन मुख्य गटांपैकी एक गट आहेत.
सर्पिलाकार दीर्घिकांना त्यांचे नाव त्यांच्या केंद्रापासून सुरू होऊन दीर्घिकेच्या तबकडीमध्ये विस्तारणाऱ्या सर्पिल आकाराच्या फाट्यांमुळे पडले. या फाट्यांमध्ये नवीन ताऱ्यांची उत्पत्ती होत असते आणि ते त्यांच्यातील तेजस्वी ओबी ताऱ्यांमुळे भोवतालच्या तबकडीपेक्षा जास्त प्रकाशमान दिसतात.
अंदाजे दोन तृतीयांश सर्पिलाकार दीर्घिकांमध्ये मधल्या केंद्रापासून दोन सरळ भुजा फुटून त्यांच्यापासून सर्पिल फाटे फुटलेले दिसतात. भुजायुक्त सर्पिलाकार दीर्घिकांचे प्रमाण साध्या सर्पिलाकार दीर्घिकांच्या तुलनेत बदलत गेले आहे. सुमारे ८ अब्ज वर्षांपूर्वी ते १०% होते, २.५ अब्ज वर्षांपूर्वी ते २५% झाले व आता ते सुमारे दोन तृतीयांश (६६%) आहे.
अलिकडे (१९९० च्या दशकात) आपली स्वतःची आकाशगंगा दीर्घिका भुजायुक्त सर्पिलाकार दीर्घिका आहे असा शोध लागला आहे. पण आपण आपल्या दीर्घिकेच्या आतमध्ये असल्यामुळे तिची भुजा आपल्याला दिसणे अवघड आहे. याचा सर्वात ठोस पुरावा अलिकडे स्पिट्झर अवकाश दुर्बिणीने केलेल्या आकाशगंगेच्या केंद्राजवळच्या ताऱ्यांच्या सर्वेक्षणातून मिळाला आहे.
जवळच्या विश्वातील ६०% दीर्घिका या सर्पिलाकर आणि आकारहीन दीर्घिका आहेत.
सर्पिलाकार दीर्घिका
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.