रायनएर ही आयर्लंडची एक विमानवाहतूक कंपनी आहे. १९८४मध्ये सुरू झालेल्या या कंपनीची लंडन स्टॅनस्टेड आणि डब्लिन विमानतळांवर मुख्य ठाणी आहेत. रायनएरचे मुख्यालय स्वोर्ड्स, आयर्लंड येथे आहे.
ही कंपनी किफायती दरात प्रवाशांची वाहतूक करते परंतु प्रत्येक सुविधेसाठी वेगळा आकार असतो. रायनएरकडे ३००पेक्षा जास्त बोईंग ७३७-८०० प्रकारची विमाने आहेत.
रायनएर होल्डिंग्स पीएलसी या मालक कंपनीमध्ये रायनएर डीएसी, माल्टा एर, बझ, लाउडा युरोप आणि रायनएर युके या उपकंपन्यांचा समावेश आहे. २०२४ मध्ये वार्षिक प्रवासी संख्या, विमानसंख्या आणि उड्डाणांच्या संख्येनुसार रायनएर ही युरोपमधील सर्वात मोठी विमानकंपनी आहे. समूहातील सर्वात जुनी विमानकंपनी असलेल्या रायनएर डीएसीची स्थापना १९८४ मध्ये झाली होती. रायनएर होल्डिंग्सची स्थापना १९९६ मध्ये रायनएरसाठी एक होल्डिंग कंपनी म्हणून करण्यात आली. दोन्ही कंपन्यांचे संचालक मंडळ आणि कार्यकारी अधिकारी समान आहेत. २०१९ मध्ये रायनएर आणि तिच्या उपकंपन्यांचे होल्डिंग कंपनीच्या अंतर्गत स्वतंत्र भगिनी विमानकंपन्यांमध्ये रूपांतर झाले. त्यानंतर २०१९ मध्ये माल्टा एर रायनएर होल्डिंग्समध्ये सामील झाली.
१९९७ मध्ये युरोपमधील विमान वाहतूक क्षेत्रात झालेली विमान वाहतूक नियमनमुक्ती आणि कंपनीच्या किफायतशीर व्यावसायपद्धतीच्या यशामुळे रायनएरचा वेगाने विस्तार झाला आहे. या कंपनीसमूहातील विमानकंपन्यांकडे ६०० हून अधिक विमाने आहेत. त्यांचे मार्ग जाळे युरोप, उत्तर आफ्रिका (मोरोक्को) आणि मध्य पूर्वेतील (जॉर्डन आणि तुर्की) ४० पेक्षा जास्त देशांमध्ये पसरलेले आहे. त्यांचे प्रमुख तळ डब्लिन, लंडन स्टॅनस्टेड आणि मिलान बेर्गामो विमानतळांवर आहेत. रायनएर ही आयर्लंडमधील सर्वात मोठी विमानकंपनी आहे आणि २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येनुसार ती जगातील सर्वात मोठी विमानकंपनी होती. या समूहाच्या ताफ्यातील जवळपास सर्व विमाने बोईंग ७३७ प्रकारची आहेत. ही कंपनी फोर्ब्स ग्लोबल २०००च्या यादीत आहे.
व्हॅट-मुक्त सेवांसाठी, उदा. विमानाचे भाडे, बिल किंवा रसीद देण्यास नकार देणे, कर्मचाऱ्यांच्या कामाची गचाळ परिस्थिती, अतिरिक्त शुल्कांचा अतिवापर, निकृष्ट ग्राहक सेवा, आणि येनकेनप्रकारेण प्रसिद्धी मिळवण्यासाठी जाणूनबुजून वाद निर्माण करण्याच्या वृत्तीमुळे या कंपनीवर वेळोवेळी टीका झाली आहे.
रायनएर
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.