एर लिंगस

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

एर लिंगस (आयरिश: Aer Lingus) ही आयर्लंडामधील एक विमान वाहतूक कंपनी आहे. युरोप, उत्तर अमेरिका, उत्तर आफ्रिका या ठिकाणी ही कंपनी वाहतूकसेवा पुरवते. ही आयर्लंडातील सर्वांत जुनी, अस्तित्वात असलेली विमानवाहतूक कंपनी असून, रायन एर कंपनीखालोखाल सर्वांत मोठी आयरिश विमानवाहतूक कंपनी आहे. डब्लिन विमानतळ तिचे मुख्यालय असून बेलफास्ट, कॉर्क, शॅनन व लंडन हीथ्रो हे मुख्य विमानतळ आहेत.

आयरिश सरकारद्वारे स्थापन झालेल्या या कंपनीचे २००६ ते २०१५ दरम्यान खाजगीकरण झाले आणि आता ती इंटरनॅशनल एरलाइन्स ग्रुपच्या (आयएजी) पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. या विमानकंपनीचे मुख्य कार्यालय डब्लिन काउंटी मधील क्लॉघरन येथील डब्लिन विमानतळाच्या परिसरात आहे.

१९३६ मध्ये स्थापन झालेली एर लिंगस ३१ मार्च २००७ पर्यंत वनवर्ल्ड विमान युतीची सदस्य होती. आयएजीने ताबा घेतल्यानंतर एर लिंगस पुन्हा वनवर्ल्डमध्ये सामील होईल अशी अपेक्षा होती परंतु १५ नोव्हेंबर २०१७ रोजी एका पत्रकार परिषदेत विमानकंपनीचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीवन कॅव्हॅनॉ यांनी हे नाकारले. या विमानकंपनीचे वनवर्ल्ड, स्टार अलायन्स आणि स्कायटीम सदस्यांसोबत कोडशेर करार आहेत, तसेच एतिहाद एरवेझ, जेटब्लू एरवेझ आणि युनायटेड एरलाइन्स सोबत इंटरलाईन करार आहेत. एर लिंगसचा आपला व्यवसाय किफायतशीर आणि पारंपारिक अशा दोन्ही पद्धतींचे संकरण करून चालवते. युरोपियन मार्गांवर मिश्र सेवा आणि ट्रान्सअँटलांटिक मार्गांवर पूर्ण सेवा देणारी द्वि-स्तरीय उड्डाणे चालवते.

२०१५ मध्ये आयएजी ने विकत घेण्यापूर्वी रायनएरकडे एर लिंगसचे २९+% आणि आयरिश सरकारकडे २५+% समभाग होते. २ ऑक्टोबर २००६ रोजी सरकारने डब्लिन येथील आयरिश स्टॉक एक्सचेंज आणि लंडन स्टॉक एक्सचेंजमध्ये कंपनीची नोंदणी करण्याचा निर्णय घेईपर्यंत सरकारकडे ८५% हिस्सा होता. एर लिंगसच्या व्यवसायसमूहात एर लिंगस लिमिटेड, एर लिंगस बिची लिमिटेड, एर लिंगस (आयर्लंड) लिमिटेड आणि डर्नन इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आहेत.

२६ मे २०१५ रोजी अनेक महिन्यांच्या चर्चेनंतर, आयरिश सरकारने कंपनीतील आपला २५% हिस्सा विकण्यास संमती दिली. रायनएरकडे एर लिंगसचा ~३०% हिस्सा होता, जो त्यांनी १० जुलै २०१५ रोजी प्रति समभाग २.५५ युरो दराने आयएजी ला विकण्याचे मान्य केले. ऑगस्ट २०१५ मध्ये एर लिंगसच्या भागधारकांनी अधिकृतपणे आयएजीला विकले जाण्याचे स्वीकारले. त्यानंतर २ सप्टेंबर २०१५ रोजी आयएजी ने एर लिंगसचे नियंत्रण आपल्या हातात घेतले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →