मेदिची घराणे हे इटलीमधील सावकार, बँकर आणि राजकारणी घराणे होते. १५व्या शतकात कोसिमो मेदिची आणि लॉरेंझो इल मॅग्निफिको यानी सुरुवाली फिरेंझेमध्ये सत्ता मिळवली. कालांतराने इटली आणि युरोपमधील प्रमुख सत्ताकेंद्रांमध्ये मेदिचींचा थेट प्रभाव होता. बांको दै मेदिची ही युरोपातील सगळ्यात मोठी बँक यांच्या मालकीची होती.
१५३२मध्ये मेदिचींनी दुका देल्ला रिपब्लिका फियोरेंतिना (फ्लोरेन्सचे ड्यूक) ही वंशपरंपरागत पदवी मिळवली. १५६९मध्ये अधिक मोठ्या प्रदेशावरील ग्रांदुकातो दि तोस्काना (तोस्कानाचे ग्रँड ड्यूक) हे पद त्यांनी धारण केले. ही जहागिर १७३७पर्यंत या घराण्यात होती. मेदिची घराण्याचे चार पुरुष कॅथोलिक पोप झाले -- पोप लिओ दहावा (१५१३-१५२१), पोप क्लेमेंट सातवा (१५२३-१५३४), पोप पायस चौथा (१५५९-१५६५) आणि पोप लिओ अकरावा (१६०५). मेदिची घराण्याच्या दोन स्त्रीया फ्रांसच्या राण्या झाल्या — कॅथरीन दे मेदिची (१५४७-१५५९) आणि मेरी दे मेदिची (१६००-१६१०). मेदिची घराण्याने अनेक पिढ्या आर्थिक आणि राजकीय भरभराट पाहिली परंतु कोसिमो तिसरा दे मेदिची च्या काळात ते दिवाळखोर झाले आणि ज्यान गास्तोनेच्या मृत्यूनंतर निर्वंश झाले
१३९७मध्ये सुरू झालेली बांको दै मेदिची १४९४मध्ये कोसळेपर्यंत युरोपातील सगळ्यात प्रसिद्ध आणि समृद्ध बँकांपैकी एक होती. मेदिचींनी सर्वप्रथम द्विनोंदी पद्धत वापरणे सुरू केले, ज्याद्वारे व्यापारातील देवघेवींचा अचूक ताळमेळ बसतो. ही पद्धत वापरल्याने पैशांचा अपव्यय किंवा गोंधळ झाल्यास तो त्वरित शोधून काढता येतो. याशिवाय व्यापारातील देणी आणि लेणी यांचा हिशोब ठेवण्यासाठी जनरल लेजर प्रणाली वापरणाऱ्यांपैकी मेदिची बँक आणि त्यांचे इतर व्यवसाय अग्रगण्य होते.
मेदिची घराण्याने व्हॅटिकन सिटीमधील सेंट पीटर बॅसिलिका आणि फिरेंझेमधील कॅताद्राले दि सांता मारिया देल फियोरे बांधण्यासाठी अमाप पैसा ओतला. हे घराणे दोनातेल्लो, ब्रुनेलेशी, बोत्तिचेल्ली, लिओनार्दो दा विंची, मिकेलेंजेलो, राफेल, मॅकियाव्हेली, गॅलिलिओ, फ्रांचेस्को रेदी यांसारख्या ख्यातनाम कलावंत आणि शास्त्रज्ञांचे आश्रयदाते होते. मेदिची घराण्याचे पियानोचा शोध लागण्यात आणि आणि ऑपेराचा विकास होण्यात मोठे योगदान होते.
मेदिची घराणे
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.