१९७९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रामध्ये पुन्हा इंदिरा गांधी सत्तेवर आल्या. सत्तेवर आल्यानंतर इंदिरा गांधींनी देशातील ९ बिगर काँग्रेस सरकारे बरखास्त केली. १७ फेब्रुवारी १९८० रोजी इंदिरा गांधींच्या शिफारशीवरून राष्ट्रपतींनी शरद पवार यांचे पुलोद सरकार बरखास्त करून महाराष्ट्रात प्रथमच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. ८ जूनपर्यंत म्हणजे सुमारे चार महिने राष्ट्रपती राजवट सुरू होती. दरम्यान, इंदिरा गांधींनी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका जाहीर केल्या. महाराष्ट्राच्या सहाव्या विधानसभेसाठी व २८८ जागांसाठी २१ मे १९८० रोजी मतदान झाले. या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसने २८८ पैकी तब्बल १८६ जागा जिंकल्या. मागील निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या जनता पक्षाचे यावेळी केवळ १७ आमदार निवडून आले होते. रेड्डी काँग्रेसच्या ४७ जागा निवडून आल्या. भाजपचे १४, शेकापचे ९, कम्युनिस्टांचे ४ आणि १० अपक्ष उमेदवार निवडून आले.
आणीबाणीनंतरच्या कठीण परिस्थितीत इंदिरा गांधींच्या बाजूने राहिलेल्या अब्दुल रहमान अंतुले यांच्याकडे इंदिरा गांधींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सोपवले. ८ जून १९८० रोजी बॅरिस्टर अंतुले यांची काँग्रेस पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. विशेष म्हणजे जेव्हा त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली तेव्हा ते कोणत्याही सभागृहाचे (महाराष्ट्र विधानसभा किंवा विधान परिषद) सदस्य नव्हते. ९ जून १९८० रोजी राज्यपाल सादिक अली यांच्याकडून अंतुले यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पुढे २३ नोव्हेंबर १९८० रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत अंतुले विजयी झाले व ते विधानसभेचे सदस्य झाले. १९८० मध्ये बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री ठरले.
सिमेंट परवानाप्रकरणी इंदिरा गांधी प्रतिष्ठानला दिलेल्या निधीचा मुद्दा त्यावेळी संसदेत गाजला आणि यामध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींच्या नावाचा वापर झाल्याने अंतुलेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यावेळी राज्यात सिमेंटचा तुठवडा निर्माण झाला होता. सिमेंट घोटाळ्याचे प्रकरण सर्वोच्च प्रकरणात पोहोचले व हा खटला तब्बल १६ वर्षे चालला. शेवटी अंतुले या प्रकरणातून निर्दोष सुटले मात्र त्यांचे मुख्यमंत्रीपद गेले ते गेलेच. ९ जून १९८० ते २० जानेवारी १९८२ पर्यंत अंतुले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी होते.
अंतुलेनंतर २१ जानेवारी १९८२ रोजी बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. १९७८ च्या निवडणुकीत बाबासाहेब पराभूत झाले होते. मात्र १९८० च्या मध्यावधी निवडणुकीत ते कुर्ला मतदारसंघातून विजयी झाले. अंतुले मुख्यमंत्री असताना भोसलेंकडे कायदा, परिवहन व कामगार खात्यांचा कारभार होता. बाबासाहेब भोसले यांचे विनोदी वर्तन, अगदी साध्या निर्णयासाठी सुद्धा दिल्लीला जाणे, इंदिरा गांधींवरील अति निष्ठा यामुळे भोसले वृत्तपत्रांच्या टीकेचा विषय बनले. महाराष्ट्रात पक्षाची आणखी दुर्दशा होऊ नये म्हणून इंदिरा गांधींनीच बाबासाहेब भोसले यांना मुख्यमंत्रीपदावरून काढले. १ फेब्रुवारी १९८३ पर्यंत म्हणजेच फक्त १३ महिनेच भोसले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर होते.
१ फेब्रुवारी १९८३ रोजी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली आणि वसंतदादा पाटील तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. वसंतदादा २ फेब्रुवारी १९८३ ते ९ मार्च १९८५ असा सुमारे २ वर्ष मुख्यमंत्रीपदी होते. सहाव्या विधानसभेसाठी शरद दिघे हे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते. या पाच वर्षात तीन मुख्यमंत्री तर सादिक अली, ओ.पी.मेहरा व आय.एच. लतिफ असे राज्यपाल महाराष्ट्राने पाहिले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९८०
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?