महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्र राज्यशासनाचे प्रमुख असतात. महाराष्ट्र विधानसभेत बहुमत प्राप्त केलेल्या पक्षाला (किंवा युतीला) महाराष्ट्राचे राज्यपाल सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करतात आणि मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात. जर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली व्यक्ती महाराष्ट्राच्या विधानसभेचा किंवा विधानपरिषदेचा सदस्य नसेल, तर भारतीय राज्यघटनेनुसार त्या व्यक्तीस शपथ घेतल्यापासून सहा महिन्यांच्या आत विधानसभेचा किंवा विधानपरिषदेचा सदस्य होणे आवश्यक आहे, नाहीतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागतो. मुख्यमंत्री पदासाठी कोणत्याही मुदतीच्या मर्यादा नाहीत, जोपर्यंत विधानसभेत बहुमत आहे तो पर्यंत ती व्यक्ती मुख्यमंत्री पदावर राहू शकते. विधानसभेचा कालावधी हा पाच वर्षाचा असतो.
१ मे १९६० रोजी द्विभाषिक मुंबई राज्याचे विघटन करून महाराष्ट्राची निर्मिती झाली. १९५६ पासून मुंबई राज्याचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यांनी १९६२ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत पदभार सांभाळला. त्यांच्यानंतर मारोतराव कन्ननवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, परंतु पदावर असतानाच त्यांचे अकाली निधन झाले. ५ डिसेंबर १९६३ ते २१ फेब्रुवारी १९७५ या काळात ११ वर्षांहून अधिक काळ कार्यभार सांभाळणारे वसंतराव नाईक आतापर्यंत सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत. देवेंद्र फडणवीस (२०१४-२०१९) पर्यंत पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ (१९६७-१९७२) पूर्ण करणारे ते पहिले आणि एकमेव मुख्यमंत्री होते. शरद पवार हे महाराष्ट्राचे आतापर्यंतचे सर्वात कमी वयात मुख्यमंत्री होणारे व्यक्ती आहेत आणि सर्वाधिक चार वेळा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत.
आतापर्यंत, राज्यात तीनदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे: पहिली १९८० मध्ये आणि नंतर २०१४ आणि २०१९ मध्ये लागू करण्यात आली. ५ डिसेंबर २०२४ पासून विद्यमान भारतीय जनता पक्षाचे श्री.देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?