फुलांचा वापर विविध प्रकारच्या सजावटीसाठी तसेच सौंदर्यप्रसाधनासाठी करण्याची प्रथा प्राचीन व सार्वत्रिक आहे. फुलांचे विविध रंग, गंध वा आकार यांचे नित्य आकर्षण माणसाला वाटत आले आहे. प्रदेशपरत्वे फुलांची विविधता व विपुलता यांचे प्रमाण कमीअधिक असले, तरी सामान्यतः ती सर्वांना सहजपणे उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळेच गरीब व श्रीमंत, आदिवासी व आधुनिक, ग्रामीण आणि नागरी अशा सर्वच गटांतील स्त्री-पुरुषांना, फुलांचे सुशोभन आणि प्रसाधन करण्याची सारखीच आवड असते. फुलांच्या नित्यनैमित्तिक वापरातूनच प्रत्येक समाजात पुष्पसजावट व पुष्पप्रसाधन यांबाबत काही संकेत रूढ झाल्याचे दिसून येतात. स्त्री-पुरूषांच्या वैयक्तिक प्रसाधनात समाजविशिष्ट शैली दिसून येतात व समाजातील धार्मिक विधी, विवाह सोहळे तसेच इतर सण-समारंभ यांसारख्या प्रसंगी करावयाचे फुलांचे साजशृंगारही संकेतबद्ध असतात. काही राष्ट्रांनी विशिष्ट फुलांना आपले राष्ट्रीय फूल मानले आहे. ऊदा., भारताचे व ईजिप्तचे कमळ, इंग्लंड व इराण यांचा गुलाब, रशियाचे सूर्यफूल, चीनचे नर्गिस (नार्सिसस), जपानचे हेमपुष्प (क्रिसॅन्थिमम्) इत्यादी. फुलबाग राखून समाजाच्या फुलासंबंधीच्या नित्यनैमित्तिक गरजा भागविणारा फुलमाळ्यांचा स्वतंत्र वर्गही उदयास आल्याचे दिसून येते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पुष्पसजावट
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.