कंठभूषणे

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

कंठभूषणे हे गळ्यात घालावयाचे अलंकार असतात. प्राचीन काळी रानटी स्थितीत असलेला मानव शोभेसाठी गळ्यात हाडांच्या, खड्यांच्या, दातांच्या किंवा लाकडी मण्यांच्या माळा घालीत असे. अद्यापही मागासलेल्या जमातीत हा प्रकार आढळून येतो. कंठभूषणाकरिता शंख-शिंपल्यांचा आणि धान्याचाही उपयोग काही ठिकाणी केलेला आढळून येतो.

कंठभूषणांचे सामान्यतः तीन प्रकार आढळतात:



मागच्या बाजूला फासा असलेली धातूची गोल कडी ही पहिल्या प्रकारात मोडते. प्राचीन इजिप्तमधील लोखंडी कडी व इटलीतील तांब्याची कडी याच प्रकारातील होत. भारतात याला हसळी म्हणतात. आदिवासी लोकात अशा प्रकारची कंठभूषणे आढळतात.

अनेक पदके लहान लहान कड्यांनी जोडलेली कंठभूषणे दुसऱ्या प्रकारात मोडतात. आपल्याकडील पुतळ्यांची माळ या प्रकारातील होय.

तिसऱ्या प्रकारच्या कंठभूषणांत लोंबती पदके साखळीने जोडलेली असतात आणि त्यांच्या मधोमध एक मोठे पदक असते. हा प्रकार प्राचीन इजिप्त, इटली, ग्रीस इ. देशांप्रमाणे भारतातही रूढ होता. काही आधुनिक कंठभूषणांतही हा प्रकार आढळतो.

वरील तिन्ही प्रकार एकत्रित केलेलीही कंठभूषणे आढळतात. कंठभूषणांत हाडे, शंख-शिंपल्यांप्रमाणे अनेक धातू, मोती, रत्ने यांचा वापर करतात. फुलांच्या माळा हा प्रासंगिक कंठभूषणांचाच एक प्रकार होय. सोने, रुपये, तांबे इ. धातू व मौल्यवान रत्ने यांचा शोध लागल्यानंतर कंठभूषणांत धातूंचा व रत्नांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला. साध्या किंवा पीळ दिलेल्या सळ्या प्रारंभी वापरात आल्या. नंतर त्यांत मौल्यवान रत्ने जडविली जाऊ लागली. सोन्याच्या बहुविध गुणधर्मामुळे त्याला महत्त्व प्राप्त झाले व सोन्यावर नक्षीकाम करून अगर त्यात रत्ने जडवून किंवा त्यावर मुलाम्याचे काम करून, विविध प्रकारच्या माळा कौशल्याने गुंफण्यात येऊ लागल्या.

प्रारंभी स्त्रिया व पुरुष दोघेही विविध प्रकारचे अलंकार गळ्यात घालीत. परंतु पुढे पुढे स्त्रियाच विशेष प्रमाणात कंठभूषणे वापरू लागल्या व खास स्त्री-वर्गासाठी अनेक प्रकारची कंठभूषणे तयार होऊ लागली. हे कंठभूषणातील विविध प्रकार भारतातील प्राचीन शिल्पात पहावयास मिळतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →