शिरोभूषणे व शिरोवेष्टने

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

शिरोभूषणे व शिरोवेष्टने ही सामान्यत: संरक्षण, सुशोभन, तसेच व्यवसायविशिष्ट संसूचन यांसारख्या अनेकविध उद्दिष्टांनी, स्त्री-पुरुषांनी डोक्यावर परिधान केलेली आवरणे वा अलंकार असे. प्राचीन काळापासून शिरोभूषणे व वेष्टने हा स्त्री-पुरुषांच्या वेषभूषेचा एक महत्त्वाचा व वैशिष्ट्यपूर्ण घटक समजला जातो. विशिष्ट विधी, सण वा उत्सवप्रसंगी विशेषत्वाने शिरोभूषणे वापारण्याची प्रथा प्राचीन काळापासून रूढ आहे. विशिष्ट प्रदेशातील हवामान, उपलब्ध साधनसामग्री, धर्म व रूढी, रीतिरिवाज व वेषभूषेतील वेधक पद्धती (फॅशन) यांनुसार शिरोवेष्टने व भूषणे यांच्या असंख्य शैली व आकार-प्रकार वेगवेगळ्या कालखंडात व जगभरातील वेगवेगळ्या प्रदेशांत निर्माण झाल्याचे दिसून येते. जवळजवळ सर्वच प्रकारची साधन-सामग्री (उदा., लोकर, कापड, धातू, गवत, प्राण्यांची शिंगे, काच, रत्ने, पिसे, फुले, फिती, संश्लेषित पदार्थ इ.) निरनिराळ्या शिरोवेष्टनांच्या निर्मितीत व सजावटीत वापरली गेल्याचे आढळून येते. संरक्षक व सुशोभित शिरोवेष्टनांत वेगवेगळ्या आकार-प्रकारांच्या हॅट, टोप्या, पगड्या, पागोटी, फेटे, डोक्याला बांधावयाचे रुमाल, फिती, पट्टे व अन्य शीर्षाच्छादने, शिरस्त्राणे इत्यादींचा समावेश होतो. कृत्रिम केसांचे टोप, बुरखे आदींचा वापरही डोक्याच्या संरक्षणार्थ व सुशोभनार्थ केला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →