पंच निर्णय पुनरावलोकन प्रणाली

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

पंच निर्णय पुनरावलोकन प्रणाली (संक्षिप्त रूप युडीआरएस (UDRS) किंवा डीआरएस (DRS)) ही क्रिकेटमध्ये वापरली जाणारी एक तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली आहे. फलंदाज बाद झाला आहे किंवा नाही ह्या मैदानावरील पंचांच्या वादग्रस्त निर्णयाचे पुनरावलोकन करण्याच्या एकमात्र उद्देशाने सदर प्रणाली ही सुरुवातीला कसोटी क्रिकेट मध्ये वापरली गेली. सन २००८ च्या भारत वि. श्रीलंका सामन्यामध्ये सर्वप्रथम ह्या प्रणालीची चाचणी घेण्यात आली, आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने २४ नोव्हेंबर २००९ रोजी युनिव्हर्सिटी ओव्हल, ड्युनेडिनयेथे सुरू झालेल्या न्यू झीलंड क्रिकेट संघ आणि पाकिस्तान क्रिकेट संघ दरम्यानच्या पहिल्या कसोटीमध्ये अधिकृतपणे ही प्रणाली सुरू केली. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सदर पद्धत जानेवारी २०११ मध्ये इंग्लंडच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान वापरण्यात आली. सुरुवातीला आयसीसीने युडीआरएस प्रणाली सर्व आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी बंधनकारक केली होती, परंतु नंतर त्याचा वापर ऐच्छिक केला गेला, त्यामुळे जर दोन्ही संघांची सहमती असेल तरच प्रणाली वापरली जाईल असे घोषित करण्यात आले. आयसीसीने तंत्रज्ञानावर काम सुरू ठेवण्याचे आणि आयसीसीच्या सर्व मालिकांमध्ये सदर प्रणालीचा वापर अंतर्भूत करण्याचा प्रयत्न करण्याचे मान्य केले आहे.

ऑक्टोबर २०१२ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने पायचीत नियमाबाबतबाबत काही बदल केले, त्यायोगे निर्णयातील अनिश्चिततेबाबत सुधारणा करण्यात आल्या. जुलै २०१६ मध्ये, पुन्हा एकदा नियम बदलले गेले, त्यामुळे अनिश्चितता आणखी कमी होण्यात मदत झाली. सुधारित नियम सप्टेंबर २०१६ मधील आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या एकदिवसीय सामन्यात सर्वप्रथम वापरण्यात आले.

सप्टेंबर २०१३ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने घोषित केले की, ऑक्टोबर २०१३ पासून, कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात दर ८० षटकांनंतर प्रत्येक संघ दोनवेळा पंचांच्या निर्णयाविरोधात दाद मागू शकतील. याआधी निर्णयाविरुद्ध दाद मागण्याची मुभा कसोटीच्या एका डावात फक्त दोन-अयशस्वी रेफरल पुरती मर्यादित होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →