न्यू झीलंड क्रिकेट संघाने सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०१६ दरम्यान ३-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा दौरा केला. कसोटी मालिका भारताने ३-० अशी जिंकली तर शेवटच्या एकदिवसीय सामन्यात न्यू झीलंडचा दणदणीत पराभव करून एकदिवसीय मालिका ३-२ अशी खिशात टाकली.
एप्रिल २०१६ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जाहीर केले होते की या कसोटी मालिकेतील एक कसोटी सामना दिवस-रात्र खेळवला जाईल. त्यावर प्रतिक्रिया देताना न्यू झीलंड क्रिकेटने नमूद केले की "त्याआधी इतर बऱ्याच गोष्टींना अंतिम स्वरूप देणे बाकी आहे". जून २०१६, मध्ये भारताने २०१६/१७ च्या मोसमासाठी वेळापत्रक जाहीर केले, परंतु त्यात कोठेही दिवस/रात्र कसोटीबद्दल नमूद केले नव्हते. परंतु बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने सांगितले की कोलकातामधील सामना दिवस/रात्र होणार आहे. परंतु यानंतर जूनच्या शेवटी सामन्यांच्या तारखांची घोषणा झाली, आणि बीसीसीआयने नमूद केले की सर्व कसोटी सामने स्थानिक वेळेनुसार ९:३० वाजता सुरू होतील. सप्टेंबर २०१६ मध्ये, बीसीसीआयने २०१६-१७ मोसमातील कोणतीही कसोटी दिवस/रात्र खेळवली जाणार नाही ह्या वृत्ताला पुष्टी दिली.
सप्टेंबर २०१६ मध्ये बीसीसीआयने १९ ऑक्टोबर रोजी निर्धारित असलेला दुसरा एकदिवसीय सामना करवा चौथमुळे २० ऑक्टोबर रोजी खेळवण्याचा निर्णय घेतला. कानपूर येथे होणारा पहिला कसोटी सामना हा भारताचा ५०० कसोटी सामना असेल. धरमशाला येथे खेळवला गेलेला पहिला एकदिवसीय सामना हा भारताचा ९०० वा एकदिवसीय सामना होता.
दुसरी कसोटी संपल्या नंतर, लोढा समितीने बीसीसीआयची बँक खाती गोठविली आहेत अशा बातम्या आल्या. त्यानंतर बीसीसीआयने दौऱ्यावरील उर्वरीत सामने रद्द होण्याची भिती व्यक्त केली. न्यू झीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट म्हणाले, संघ दौरा चालूच ठेवेल आणि सध्या इंदूरला जायची तयारी करत आहे. लोढा समितीने त्यांचे म्हणणे स्पष्ट करताना सांगितले की बीसीसीआयची कोणतीही खाती गोठवण्यात आलेली नाहीत, परंतु मंडळाशी संलग्न राज्य संघटनांना पैसे देण्यास मनाई करण्यात आलेली आहे.
कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी जिंकून भारतीय संघाने पाकिस्तानला मागे टाकून आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. तिसऱ्या कसोटीसह मालिका ३-० अशी जिंकल्यानंतर भारतीय संघाला आयसीसी कसोटी अजिंक्यपदाची गदा बहाल करण्यात आली. असा मान मिळवणारा विराट कोहली हा दुसरा भारतीय कर्णदार ठरला.
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.