निहाल अहमद (१९२५-२०१६) प्रजा समाजवादी पक्षाचे प्रसिद्ध पुढारी होते. गरिबांचा नेता अशी त्यांची राजकारणात आणि समाजात ओळख होती. निहाल अहमद मौलवी मोहमद उस्मान असे त्यांचे पूर्ण नाव होते. तरी महाराष्ट्राला मात्र, ते निहालभाई म्हणूनच परिचित होते. निवडणूक आयोगाकडे नोंदवलेल्या माहितीनुसार त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले होते. सोशालिस्ट पार्टी, प्रजा समाजवादी पक्ष, जनता पक्ष, जनता दल, जनता दल (सेक्युलर) असा राजकीय प्रवास करीत त्यांनी राजकारणात आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता.
निहाल अहमद १९६४ मध्ये मालेगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष होते. त्यांनी १९६७ मध्ये प्रजा समाजवादी पक्षाच्या तिकिटावर पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवून विजयश्री संपादन केली होती. त्यानंतर १९७२चा अपवाद वगळता १९७८ ते १९९५ पर्यंत त्यांनी आमदारकी भूषविली होती. पुलोद मंत्रिमंडळात १९७८ मध्ये रोजगार हमी योजनामंत्री होते. १९८६ ते ९० दरम्यान विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी भूमिका बजावली. मालेगाव महापालिका अस्तित्वात आल्यानंतर २००२ मध्ये प्रथम महापौर होण्याचा मानही त्यांना मिळाला होता.
मालेगाव नगर परिषदेचे अध्यक्ष, महापौर, सात वेळा आमदार अशी प्रदीर्घ राजकीय कारकीर्द त्यांनी गाजवली. एस.एम. जोशी यांचे मानसपुत्र म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख होती. मधु दंडवते, मधु लिमये आदी समाजवादी नेत्यांच्या बरोबरीने समाजवादी चळवळीचा खंदा आधारस्तंभ बनले. नानासाहेब गोरे, माजी पंतप्रधान व्हीपी सिंह, देवेगौडा, बापूसाहेब काळदाते आणि जॉर्ज फर्नांडिस यांसारख्या दिग्गज समाजवादी नेत्यांशी त्यांचा संबंध होता.
निहाल अहमद
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.