डीट्रॉइट (इंग्लिश: Detroit; स्थानिक प्रचलित उच्चार : डेट्रॉईट) हे अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. डीट्रॉइट शहर मिशिगनच्या आग्नेय भागातील वेन काउंटीमध्ये डीट्रॉइट नदीच्या काठावर वसले असून नदीच्या पलिकडील बाजूस कॅनडातील विंडसर हे शहर आहे.
डीट्रॉइट शहर येथील मोटारवाहन उद्योगासाठी जगप्रसिद्ध आहे. फोर्ड, जनरल मोटर्स तसेच क्रायस्लर ह्या जगप्रसिद्ध मोटार कंपन्यांची मुख्यालये डीट्रॉइट आणि त्याच्या उपनगरांत असल्याने हे शहर जगाची मोटारवाहन राजधानी (Automobile Capital of World) ह्या नावाने तसेच मोटर सिटी व मोटाऊन ह्या टोपणनावांनीदेखील ओळखले जाते.
२४ जुलै १७०१ रोजी ॲंतोइन देला मोथा कादिलाक ह्या फ्रेंच शोधकाने डीट्रॉइटची स्थापना केली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला हेन्री फोर्ड व इतर उद्योगपतींनी येथे मोटार कारखाने उघडले व अमेरिकन मोटार उद्योगाचे डीट्रॉइट हे सर्वात मोठे केंद्र बनले ज्यामुळे ह्या भागाचा झपाट्याने विकास झाला. प्रगतीच्या अत्युच्च शिखरावर असताना १९५० च्या दशकामध्ये डीट्रॉइट हे अमेरिकेतील पाचवे मोठे शहर होते. तेव्हापासून येथील मोटार उद्योगाची अधोगती, शहरातील रहिवाशांचे उपनगरांमध्ये स्थलांतर इत्यादी विविध कारणांमुळे डीट्रॉइट शहराची लोकसंख्या घटत आहे. २००० ते २०१० ह्या १० वर्षांदरम्यान डीट्रॉइटची लोकसंख्या २५ टक्के घसरली आहे. आजच्या घडिला ७.१३ लाख लोकसंख्या असलेले डीट्रॉइट शहर अमेरिकेतील १८व्या क्रमांकाचे शहर आहे तर ४३ लाख वस्ती असलेले डीट्रॉइट महानगर क्षेत्र अमेरिकेत ११व्या स्थानावर आहे.
डीट्रॉइट
या विषयावर तज्ञ बना.