आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आयोजित केलेली आयसीसी क्रिकेट विश्वचषक, २००३ ही क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची आठवी आवृत्ती होती. ९ फेब्रुवारी ते २३ मार्च २००३ दरम्यान पार पडलेल्या सदर स्पर्धेचे यजमान पद दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि केन्या ह्या देशांकडे संयुक्तरित्या सोपवण्यात आले होते. आफ्रिकेमध्ये खेळविण्यात आलेला ही पहिलीच विश्वचषक स्पर्धा होती.
सदर स्पर्धेत १४ संघांचा सहभाग होता, विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील ही आजवरची सर्वात मोठी संख्या होती, ज्यामध्ये एकूण ५४ सामने खेळविले गेले. ह्या स्पर्धेचे स्वरूप क्रिकेट विश्वचषक, १९९९ प्रमाणेच होते, ज्यामध्ये संघांची दोन समान गटांमध्ये विभागणी केली गेली होती आणि प्रत्येक गटातील तीन अव्वल संघ सुपर सिक्स फेरी साठी पात्र ठरले.
स्पर्धेमध्ये अनेक धक्कादायक निकाल पहायला मिळाले, ज्यात दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, वेस्ट इंडीज आणि इंग्लंड ह्या संघांवर गट फेरीतच बाद होण्याची नामुष्की ओढवली (दक्षिण आफ्रिकेला डकवर्थ-लुईस नियमाचा फटका बसला आणि त्यांची सुपर सिक्स फेरी अवघ्या १ धावेने हुकली). देशातील राजकिय अशांततेमुळे इंग्लंडने त्यांचा झिम्बाब्वेविरुद्धचा सामना सोडून दिला, ज्यामुळे झिम्बाब्वेचा सुपर सिक्स फेरीमध्ये समावेश होऊ शकला. त्याचप्रमाणे, सुरक्षिततेच्या कारणांमुळे न्यू झीलंडने त्यांचा केन्याविरुद्धचा सामना सोडून दिला, ज्यामुळे केन्याचा संघ कसोटी दर्जा नसताना उपांत्य सामन्यात पोहोचणारा पहिला संघ ठरला. त्याशिवाय आणखीएक धक्का देणारी बातमी स्पर्धा सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आली, ती म्हणजे ऑस्ट्रेलियाचा अव्वल फिरकी गोलंदाज शेन वॉर्नला, प्रतिबंधित पदार्थाच्या सेवनामुळे स्पर्धेबाहेर पडावे लागले.
आपले सर्व ११ सामने जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने जोहान्सबर्ग येथील वॉन्डरर्स स्टेडियम झालेल्या अंतिम सामन्यात भारताला पराभूत करून स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. विश्वचषक स्पर्धा तीन वेळा जिंकणारा ऑस्ट्रेलिया हा एकमेव संघ ठरला.
क्रिकेट विश्वचषक, २००३
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.