एरबस ए३८०

यामागील विज्ञान आणि इतिहास.

एरबस ए३८०

एरबस ए३८० हे फ्रान्समधील एरबस ह्या कंपनीने विकसित व उत्पादित केलेले लांब पल्ल्याचे, जगातील सगळ्यात जास्त प्रवासीक्षमता असलेले दोनमजली विमान आहे. चार इंजिने असलेले हे विमान ५२५ ते ८५३ प्रवाशांना १५,७०० कि.मी. पर्यंत नेऊ शकते. म्हणजेच हे विमान डॅलस ते सिडनी दरम्यान विनाथांबा जाऊ शकते. एरबस ए३८० चे पहिले उड्डाण २७ एप्रिल २००५ रोजी पार पडले तर ह्या विमानाची पहिली प्रवासी सेवा सिंगापूर एरलाइन्स ह्या कंपनीने २५ ऑक्टोबर २००७ रोजी पुरवली.

एरबसने प्रतिस्पर्धी विमान उत्पादक बोइंगचे लांब पल्ल्याच्या विमानांवरील वर्चस्व मोडून काढण्यासाठी जून १९९४ मध्ये ह्या विमानाची घोषणा केली. १९ डिसेंबर २००० रोजी एरबसच्या प्रशासनाने ८.८ अब्ज युरो इतक्या खर्चाचा एरबस ए३८० विमान विकासाचा आराखडा मंजूर केला. २३ जानेवारी २००२ रोजी ह्या विमानाच्या पहिल्या सुट्या भागाचे उत्पादन सुरू झाले. पहिले विमान बांधून पूर्ण होईपर्यंत ह्या पूर्ण परियोजनेचा एकूण खर्च ११ अब्ज युरोंवर पोचला होता. अतिविशाल आकाराच्या ह्या विमानाचे सुटे भाग फ्रान्स, जर्मनी, युनायटेड किंग्डम व स्पेन ह्या देशांमध्ये बनवले जातात व तुलूझमधील प्रमुख कारखान्यामध्ये एकत्र जोडले जातात. ह्या विमानामधील अत्यंत गुंतागुंतीच्या विद्युत जोडण्या करण्यासाठी ५३० किमी लांबीच्या तारा वापरल्या जातात. एरबसने महिन्याला ४ ए३८० विमाने पूर्ण करण्याची क्षमता बनवली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →