आसावरी काकडे (जन्म : २३ जानेवारी, १९४९) या एक मराठी-हिंदी कवयित्री आणि गद्यलेखक आहेत. त्यांनी बी.कॉम. नंतर मराठी आणि तत्त्वज्ञान या दोन विषयांत एम.ए. केले आहे.
आसावरी काकडे यांच्या स्वरचित कवितांशिवाय त्यांनी डॉ. विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या निवडक हिंदी कवितांचा ’तरीही काही बाकी राहील’ या नावाचा अनुवाद केला आहे.
दीप्ती नवल यांच्या 'लम्हा लम्हा' या हिंदी कवितासंग्रहाचा त्याच नावाचा अनुवाद केला आहे.
डॉ. चंद्रप्रकाश देवल यांच्या `बोलो माधवी' या हिंदी कवितासंग्रहाचा ’बोल माधवी’ या नावाचा अनुवाद केला आहे.
’मेरे हिस्से की यात्रा’ हा आसावरी काकडे यांनी स्वतःच्याच निवडक कवितांचा केलेला हिंदी अनुवाद आहे.
आसावरी काकडे यांनी नवी दिल्ली येथील आकाशवाणीतर्फे आयोजित जयपूर येथील सर्वभाषी कविसंमेलनात (National Symposium of Poet 2002) मराठीचे प्रतिनिधित्व केले आहे.
आसावरी काकडे यांच्या कविता महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या ७वी-८वी-११वीच्या विद्यार्थ्यांच्या आणि पुणे-नाशिक येथील विद्यापीठांच्या कला शाखेच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी त्यांच्या पुस्तकांत समाविष्ट केल्या गेल्या आहेत.
गोवा विद्यापीठाच्या एम.ए.च्या अभ्यासक्रमात `मराठीतील अनुवादित भारतीय साहित्य' या विषयासाठी नेमलेल्या पाठ्यपुस्तकांत `बोल माधवी' या कवितासंग्रहाचा समावेश झाला आहे.
आसावरी काकडे यांनी लिहिलेली पुस्तक परीक्षणे, ललित लेख, कथा इ. गद्य साहित्य विविध नियतकालिकांतून प्रकाशित झाले आहे..
त्यांचा आकाशवाणीवरील, दूरदर्शनच्या व विविध साहित्य संमेलनांच्या कविता विषयक कार्यक्रमात सहभाग असतो.
काकडे यांच्या अनेक हिंदी कवितांचा मराठी अनुवाद विविध नियतकालिकांतून प्रकाशित झाला आहे.
`मौन क्षणों का अनुवाद' या हिंदी कवितासंग्रहातील काही कवितांचा पंजाबी, मैथिली भाषेत अनुवाद व काही मराठी कवितांचा राजस्थानी, हिंदी व इंग्रजी भाषेतील अनुवाद `जागती जोत', `भाषा', `भारतीय कविताएॅं', `समकालीन भारतीय साहित्य' "Indian Liturature" आणि Continuum 2005 - by Poetry club of India, New Delhi यात प्रकाशित.
पेंग्विन बुक्स द्वारा प्रकाशित `नव्या वाटा, नवी वळणे' या डॉ. निशिकांत मिरजकर यांनी संपादित केलेल्या प्रातिनिधिक मराठी कवींच्या कवितासंग्रहात आसावरी काकडे यांच्या पाच कविता आहेत..
आसावरी काकडे यांची 'खोद आणखी थोडेसे....' ही 'लाहो' या कवितासंग्रहातील कविता महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी मराठी प्रथम भाषेच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे.
आसावरी काकडे
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.