सांगोला किंवा सांगोले हे महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे ठिकाण आहे. दक्षिणमध्य रेल्वेच्या कुर्डवाडी-मिरज लोह-मार्गावरील हे एक स्थानक आहे. पंढरपूर या तीर्थक्षेत्रापासून हे जवळचे ठिकाण आहे. राज्य महामार्ग SH-१६१, SH-३, SH-७१ सांगोल्यातून जातात. पूर्वी फार संपन्न असल्याने 'सांगोले सोन्याचे' म्हणून हा भाग ओळखला जायचा. सांगोले हे नाव सहा - इंगोले आडनावाच्या - लोकांवरून पडले अशी आख्यायिका आहे.
सांगोल्यातील सहकारी सूत गिरणी उत्तम धाग्यासाठी प्रसिद्घ आहे. उच्च प्रतीच्या डाळिंबांच्या उत्पन्नासाठी हा तालुका ख्यातनाम असून त्यांची परदेशांतही निर्यात होते. दर रविवारी येथे जनावरांचा मोठा बाजार भरतो. सांगोल्याचे खिलार जातीचे बैल प्रसिद्घ आहेत. तसेच शहरातील प्राचीन अंबिकादेवी मंदिर प्रसिद्ध आहे. दरवर्षी रथसप्तमीला मोठी यात्रा भरत असते.
आमदार गणपतराव देशमुख हे याच महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघातून सर्वात जास्त वेळा निवडून आले होते. हा त्यांचा विश्वविक्रम होता, जो गिनीज बुकात नोंदवला गेला.
सांगोला तालुका हा सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा तालुका आहे. हा तालुका पंढरपूर पासून सुमारे २५–२६ किमी अंतरावर स्थित आहे. ऐतिहासिक, प्रशासकीय व सामाजिक दृष्टिकोनातून सांगोला तालुक्याला दख्खनच्या इतिहासात विशेष स्थान प्राप्त झाले आहे.
सांगोला
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?