मराठी लोक

या विषयावर तज्ञ बना.

मराठी लोक

मराठी लोक (महाराष्ट्रीय) हा गट मूळचा भारतीय उपखंडातील असून, दक्षिण भारताच्या दख्खन/डेक्कन प्रांत किंवा सध्याचे महाराष्ट्र राज्य, ह्या ठिकाणी या लोकांचे मूळ निवासस्थान आहे. मराठी ही त्यांची मातृभाषा असून, ती इंडो-आर्यन दक्षिण विभाग समूहातील एक प्रमुख भाषा आहे. मराठी माणसांचा लष्करी इतिहास हा असामान्य आहे. इंग्रजांच्या भारताच्या प्रवेशापूर्वी मराठा साम्राज्य हे भारतीय उपखंडात पसरले होते.

महाराष्ट्र ह्या शब्दाचा अपभ्रंश माराष्ट्र

महाराष्टे भवा: माहाराष्ट्रा:।

माराष्ट्र म्हणजे मराठा. मराठा ह्या शब्दाचे दोन अर्थ: यादव, चव्हाण, जाधव, मोरे, जगताप, संकपाळ, सोनवणे, शिर्के, शिंदे, जाधव इत्यादी जे क्षत्रिय ह्यांना महाराष्ट्रीक अशी प्राचीन संज्ञा होती. त्यांना प्रथमारंभी मराठा हे उपपद अन्यव्यावृत्यर्थ लावीत. महाराष्ट्रिकांनी वसविलेला जो देश त्याला महाराष्ट्र असे नाव पडले, नंतर त्या देशात ब्राह्मणांपासून अंत्यजापर्यंत जेवढे म्हणून हिंदू वर्ण होते, त्यांना "माराष्ट्र ऊर्फ मराठा ही व्यापक संज्ञा लावण्याचा प्रघात चालू झाला". ह्या व्यापक संज्ञेने विशिष्ट जे सर्व लोक त्यांचा जो धर्म तो महाराष्ट्रधर्म म्हणावा. भिन्न वर्ण, भिन्न गोत, भिन्न कर्म, भिन्न आचार, भिन्न पेहराव, भिन्न भूषणे, भिन्न भाषा, भिन्न कुळ्या, इत्यादी नाना उपभेद ह्या मराठ्यांत यद्यपि असले तत्रापि काही धर्म ह्या लोकांत सामान्य आहेत.

धर्म चार:-

(१) देशाचार,

(२) कुळाचार,

(३) वंशाचार,

(४) देवशास्त्राचार,

आचारप्रधानो धर्मः।

आचाराला प्रविणाचार्य धर्म म्हणतो.

(१) देशधर्म,

(२) कुळधर्म,

(३) वंशधर्म,

(४) देवधर्म.

याज्ञवल्क्यादि ऋषींनी प्रचलित केला जो आचार, व्यवहार, प्रायश्चित्तादि त्रिविध धर्म तो देशधर्म. कुळात म्हणजे गोतात ज्या कुळमान्य चाली-रीती त्या कुळधर्म, वंशांत जे प्रचलित धर्म ते वंशधर्म आणि देवसंबंधक जी कर्तव्ये ती देवधर्म. देशधर्म, कुळधर्म, वंशधर्म व देवधर्म ह्या चार धर्मांच्या अनुज्ञेप्रमाणे आपापल्या धर्मी सर्वांनी वर्तावे. त्यांत महाराष्ट्रधर्माची पहिली खूण म्हणजे, सर्वात ब्राह्मण श्रेष्ठ, हे मत मान्य असणे, तो सर्वाचा गुरू, देव गुरूरूपे सर्वास रक्षिता, सुख देता, मुक्तिदेता. हा धर्म सर्व धर्माचा जीव, म्हणून प्रविणाचार्य सांगतो. ही महाराष्ट्र धर्माची दुसरी खूण. प्रत्यही स्नान करणे ही, महाराष्ट्र धर्माची तिसरी खूण.

मूळ महाराष्ट्रधर्म म्हणजे

(१) स्नान,

(२) गुरुपदेश,

(३) मंत्रजप प्रत्यही करावा, स्नान म्हणजे शुचिर्भूतपणा, गुरुपदेश म्हणजे सर्व जातीत श्रेष्ठ जो ब्राह्मण त्याने उपदिष्ट जो आचार व्यवहार प्रायश्चितादि धर्मसमूह तो आणि मंत्रजप म्हणजे गुरुपदेशानुरूप श्रद्धायुक्त आचरण. तीर्थगुरू तीर्थाचा स्थळगुरू, स्थळाचा, श्रीगुरू कुळाचा व जगद्गुरू जगताचा म्हणजे सर्व देशाचा. जगद्गुरू तोच शंकराचार्य. शंकराचार्यांनी धर्मस्थापना केली. दक्षिणेस सेतुबंध रामेश्वर, उत्तरेस काशी, पश्चिमेस द्वारका व पूर्वेस तुळजापुर, यांच्या मधील जो पुण्यदेश तो महाराष्ट्र धर्माचे स्थान.



जो जो म्हणून स्वतःस माराष्ट्र म्हणवितो त्याने हा लक्षण त्रयांकित माराष्ट्रधर्म आचरिला पाहिजे. पैकी मराठा क्षत्रिय जो आहे त्याने कुक्कुटशब्दा (कोंबडा आरवल्या) पासोन उठावे, शौचस्नान संपादावे, देवपूजन नित्यकर्म आचार्य युक्त करावे, शास्त्र वचनाधारे न्याय निवडावा, पुराणेतिहास प्रत्यही आयकावा, व शस्त्र कमरेस बांधून भोजन सारावे, कदापि गाफील न रहावे, असे शास्त्रोक्त धर्मचोदित आचरण जो करील तो क्षत्रिय. गर्भादान, पुंसवन, चौल, व्रतबंध, विवाह, महोत्सव, विद्यारंभ, इत्यादी कर्मे वेदोक्त करण्यास सर्वथा योग्य होय. ह्या धर्मापासून पतित असे बहुत राजे शंकराचार्ये शुद्ध केले. काही तसेच अशुद्ध राहिले त्यास निराळी पद्धती नेमून दिली. विप्रांस वैदिक मंत्र, अशुद्ध क्षत्रियांस पौराणिक मंत्र व शूद्रांस तांत्रिक पद्धत शंकराचार्यांनी घालून दिली. हे अशा स्वरूपाचे प्रविणाचार्य महाराष्ट्रधर्माचे विवरण करत आहे. विवरणावरून स्पष्टच होते की महाराष्ट्र धर्म म्हणजे केवळ महाराष्ट्राचा रहिवासी नव्हे. तर महाराष्ट्रधर्म म्हणजे देशधर्म + जाति धर्म + कुलधर्म + वंशधर्म + देवधर्म होय. महाराष्ट्रांतील देशधर्म म्हणजे याज्ञवक्ल्यस्मृतीवर विज्ञानेश्वराने केलेल्या टीकेत सांगितलेले सर्व धर्म. जातिधर्म म्हणजे प्रत्येक जातीचे विशिष्ट धर्म.

१) कुलधर्म म्हणजे प्रत्येक कुलाचे विशिष्ट धर्म.

२) वंशधर्म म्हणजे उपकुलांचे ऊर्फ वंशांचे धर्म.

३) देवधर्म म्हणजे देशांत, जातीत, कुलांत, वंशात मान्य असलेल्या देवासंबंधाने व स्वतः व्यक्तिमात्राला इष्ट असलेल्या देवते संबंधाने कर्तव्ये. हे सर्व धर्म मिळून महाराष्ट्रधर्म ऊर्फ माराष्ट्रधर्म होतो. महाराष्ट्रधर्माची मुख्य व एकच एक खूण म्हटली म्हणजे गुरुत्वाच्या नात्याने सर्व धर्मसंबंधक कर्मांचे ब्राह्मणाच्या म्हणजे तीर्थगुरूच्या किंवा स्थलगुरूच्या किंवा कुलगुरूच्या किंवा जगद्गुरूच्या हस्ते संपादन. ब्राह्मणाच्या हस्ते जो कोणी कोणचे ही धर्मकर्म संपादू इच्छीत नाही तो महाराष्ट्रधर्मी नव्हे. अशा ब्राह्मण द्वेष्ट्याला जुन्या काळी पाखंडी म्हणत व धर्मबाह्य म्हणजे कायद्याच्या व रूढीच्या बाहेरचा पतित समजत.



ज्या प्रमाणे जाणा-या राजा पुढे उग्र, प्रत्येनस्, सूत व ग्रामणी एकत्र गोळा होतात; त्या प्रमाणे, अंतकाली प्राणी उर्ध्वश्वासी होतो तेव्हा आत्म्यापुढे सर्व प्राण गोळा होतात. त्या दोन कंडिकांत उग्र, प्रत्येनस्, सूत व ग्रामणी, ह्या चार कामदारांचा निर्देश केलेला आहे. ग्रामणी म्हणजे गावाचा गावुडा, मुख्य पुढारी इत्यादि. सूत म्हणजे रथकार, भाट, उग्र म्हणजे लढाऊ शिपाई. आणि प्रत्येनस म्हणजे चोराचिलटांचा बंदोबस्त करणारा पोलिस. आदी शंकराचार्य ह्या शब्दांचा असा अर्थ देतातः-

"उग्रा: जातिविशेषाः क्रूरकर्माणो वा। प्रत्येनस: प्रति प्रति एनसि पापकर्मणि नियुक्ताः प्रत्येनसः तस्करा-दिदंडनादौ नियुक्ताः।

सूताःचे ग्रामण्यःच सूतग्रामण्यः।

सूता: वर्णसंकरजाति विशेषाः।

ग्रामण्यः ग्रामनेतारः।"

अर्थ:- ग्रामणी अन्नपाण्याचा पुरवठा करी; सूत तंबू, रथ वगैरेच्या दुरुस्तीच्या कामी उपयोगी पडे; उग्र रखवालदारीचे कार्य संपादी; आणि प्रत्येनस् चोराचिलटा पासूनचे भय निवारी. उग्राः, प्रत्येनसः, सूताः, ग्रामण्यः हे सर्व शब्द अनेक वचनी आहेत. तेव्हा उघडच झाले की, शिपाई, गावचे पुढारी, डागडूजी करणारे रथकार व पोलीस हे राजाचे सेवक.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →