भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) किंवा काँग्रेस (आय) किंवा इंदिरा काँग्रेस हा इंदिरा गांधींनी १९७८ मध्ये काँग्रेस (आर)मधून बाहेर पडून स्थापन केलेला पक्ष होता, ज्यामध्ये 'आय' चा अर्थ इंदिरा असा होता. मुळात काँग्रेस (आर) ची स्थापना १९६९ साली स्वतः इंदिरा गांधी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मधून बाहेर पडल्यावर केली होती. १९७८ मध्ये, आणीबाणीच्या काळातील गैरवापरांवर टीका करणाऱ्या नंदिनी शतपथी सह काही नेत्यांनी काँग्रेस (आर) मधून राजीनामा दिला. तसेच पक्षाध्यक्षपदासाठी, गांधी समर्थक के. ब्रह्मानंद रेड्डी यांच्या विरोधात सिद्धार्थ शंकर रे यांनी आव्हान दिल्यानंतर, इंदिरा गांधींनी काँग्रेस (आर) मधून बाहेर पडून काँग्रेस (इंदिरा) ची स्थापना केली. या पक्षाचे नेतृत्व पूर्णपणे इंदिरा गांधी यांच्याकडे होते. निवडणूक आयोगाने या पक्षाला हाताचा पंजा हे अधिकृत चिन्ह दिले. पुढे चालून हेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे चिन्ह झाले. या पक्षाने १९८० च्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या विजयाने सत्तेत वापसी केली. जानेवारी १९८० मध्ये, काँग्रेस (आय) च्या प्रचंड विजयानंतर, त्या पुन्हा पंतप्रधान म्हणून निवडून आल्या. पुढे राष्ट्रीय निवडणूक आयोगाने १९८४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस (I) ला खरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस घोषित केले. तथापि, १९९६ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी, काँग्रेस (आय) ने त्यांच्या नोंदणीकृत नावातून इंदिरा हा प्रत्यय वगळला, तर काँग्रेस (ओ) ने भारतीय जनसंघ सारख्या उजव्या विचारसरणीच्या पक्षांमध्ये विलीन होऊन जनता पक्षाची स्थापना केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →