इंदिरा गांधी

या विषयातील रहस्ये उलगडा.

इंदिरा गांधी

इंदिरा प्रियदर्शिनी गांधी (पूर्वाश्रमीच्या नेहरू ; १९ नोव्हेंबर १९१७ - ३१ऑक्टोबर १९८४) या एक भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रमुख नेत्या होत्या. १९६६ मध्ये त्या भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून निवडल्या गेल्या. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान आहेत. त्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या होत्या. जानेवारी १९६६ ते मार्च १९७७ पर्यंत आणि पुन्हा जानेवारी १९८० ते ऑक्टोबर १९८४ मध्ये त्यांची हत्या होईपर्यंत त्यांनी पंतप्रधान म्हणून काम केले, ज्यामुळे त्या त्यांच्या वडिलांनंतर सर्वात जास्त काळ काम करणाऱ्या दुसऱ्या भारतीय पंतप्रधान बनल्या.

१९४७ ते १९६४ या काळात नेहरुंच्या पंतप्रधानपदाच्या काळात इंदिरा गांधींना प्रमुख सहाय्यक मानले जात होते आणि त्यांच्या अनेक परदेश दौऱ्यांवर त्या नेहरुंसोबत असायच्या. १९५९ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. १९६४ मध्ये त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर गांधींची राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्ती झाली आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणून लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळाच्या त्या सदस्या बनल्या. १९६६ च्या सुरुवातीला (शास्त्री यांच्या निधनानंतर) झालेल्या काँग्रेस पक्षाच्या संसदीय नेतृत्वाच्या निवडणुकीत त्यांनी आपले प्रतिस्पर्धी मोरारजी देसाई यांचा पराभव करून इंदिरा गांधी नेत्या बनल्या आणि शास्त्री यांच्या मृत्यूनंतर भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांची जागा घेतली.

पंतप्रधान या नात्याने इंदिरा गांधी त्यांच्या राजकीय आडमुठेपणासाठी आणि सत्तेच्या अभूतपूर्व केंद्रीकरणासाठी ओळखल्या जात होत्या. पूर्व पाकिस्तानमधील स्वातंत्र्य चळवळ आणि स्वातंत्र्याच्या लढाईच्या समर्थनार्थ त्यांनी पाकिस्तानशी युद्ध केले, ज्यामुळे भारताचा विजय झाला आणि बांगलादेशची निर्मिती झाली. तसेच या विजयामुळे दक्षिण आशियामध्ये भारताचा प्रभाव वाढून भारत हा येथील एकमेव प्रादेशिक शक्ती बनला.

अलिप्ततावादी प्रवृत्तींचा हवाला देत आणि क्रांतीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून इंदिरा गांधींनी १९७५ ते १९७७ पर्यंत आणीबाणीची घोषणा केली. आणीबाणीच्या काळात मूलभूत नागरी हक्क निलंबित केले गेले आणि प्रसारमाध्यमांवर निर्बंध लावले गेले. या काळात मोठ्या प्रमाणावर अत्याचार केले गेले. १९८० मध्ये मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांनंतर इंदिरा गांधी या पुन्हा सत्तेवर आल्या. ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये त्यांनी सुवर्ण मंदिरात लष्करी कारवाईचे आदेश दिल्यानंतर त्यांच्याच अंगरक्षकांनी आणि शीख राष्ट्रवाद्यांनी ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांची हत्या केली.

बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता. १९९९ मध्ये बीबीसीने आयोजित केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणामध्ये इंदिरा गांधींना "वुमन ऑफ द मिलेनियम" असा किताब देण्यात आला. २०२० मध्ये गेल्या शतकाची व्याख्या करणाऱ्या जगातील १०० शक्तिशाली महिलांमध्ये टाइम मासिकाने इंदिरा गांधींचा समावेश केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →