रस विचार हा भारतीय साहित्यशास्त्रातील सर्वात महत्त्वाचा विचार आहे. भरतपूर्व काळापासून काव्यातील रसाच्या महत्त्वाच्या स्थानाबद्दल साहित्यशास्त्रकारांनी निश्चिती केली आहे. परंतु काव्यातून ही रसनिष्पत्ती कशी होते याविषयी भरतमुनींनी मांडलेल्या सूत्राला संस्कृत साहित्यशास्त्रात महत्त्वाचे स्थान आहे. भरतोत्तर काळात या रससूत्राचे अनेक भाष्यकारांनी आपापल्या परीने अर्थ लावण्याचे प्रयत्न केले आहेत.
भरतमुनींचे प्रसिद्ध रससूत्र पुढीलप्रमाणे :
विभावानुभाव व्यभिचारी संयोगात् रसनिष्पत्ती |
विभाव, अनुभाव व्यभिचारी भाव यांच्या संयोगातून रसाची निष्पत्ती होते.
दैनंदिन व्यवहारात आपण अनेक घटना कार्यकारणनिबद्ध अशा घडताना पाहतो. परंतु लौकिक व्यवहारातील हे कार्यकारणादी निकष जसेच्या तसे रसविषयक व्यापाराला लावणे अयोग्य ठरेल. त्यामुळे काव्यात किंवा नाट्यात एखाद्या रसाची प्रतीती आपल्याला येते तेव्हा ती कशी येते, तिचे स्वरूप कसे असते, हे समजावून घेताना रसनिष्पत्तीस कारणीभूत ठरणारी कारणे, त्यामुळे घडणारी आणि सामान्यतः प्रतीतीला येणारी कार्ये आणि ती कार्ये घडून येण्यास सहाय्यभूत होणारी कारणे या गोष्टींना नाटकात अनुक्रमे विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव असे म्हणतात. भरतमुनींच्या रससूत्रानुसार विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव यांच्या संयोगाने रसाची निष्पत्ती होते.
भरतमुनींना येथे संयोग म्हणजे केवळ एकत्र येणे अपेक्षित नसून विभाव, अनुभाव, व्यभिचारी भाव यांच्या एकजीवतेतून होणारा संयोग अपेक्षित आहे. हा संयोग वरवरचा नसून पानक रसांसारखा असतो. ज्याप्रमाणे पानामध्ये विविध घटकांचे मिश्रण असते. परंतु त्यापासून एक वेगळीच रुची तयार होते. ही रुची एकजीव मात्र अन्य घटकांपेक्षा स्वतंत्र असते. त्याचप्रमाणे विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव यांच्या संयोगातून या घटकांपेक्षा भिन्न मात्र एकरूप अशा रसाची निष्पत्ती होते. येथे भरताने जाणीवपूर्वक निष्पत्ती हा शब्द वापरला आहे. तो निर्मिती हा शब्द वापरत नाही. कारण रस हे मानवी मनात मुळातच वास करत असतात. फक्त त्यांना चेतना मिळाली की हे रस मनात पुन्हा उफाळून येतात. यालाच रसाची निष्पत्ती असे म्हणतात. रसाच्या निष्पत्तीत कारक चेतना देण्याचे काम विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव हे घटक करतात. भरतमुनींच्या रससूत्रात केवळ विभाव, अनुभव आणि व्यभिचारी यांचा उल्लेख झालेला असला तरी त्यामध्ये स्थायीभाव अनुस्यूत आहेत. कदाचित भरतपूर्व काळात झालेल्या आचार्यांनी स्थायीभावाचा विस्तृत विचार केलेला असावा. त्यामुळेच रससूत्रात स्थायीभावाची पुन्हा चर्चा करण्याची आवश्यकता भरतमुनींना वाटली नसावी. मात्र त्यांनी विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भावांसोबतच अष्टसात्त्विक भावांचेही विवेचन केले आहे. हे अष्टसात्त्विक भाव दृश्य स्वरूपात प्रचितीला येणारे शारीरिक स्वरूपाचे आणि व्यभिचारी भावांशी समतुल्य असतात. भरतमुनींचे रससूत्र समजून घेण्यासाठी हे सर्व घटक समजावून घेणे गरजेचे आहे.
भरतमुनींचे रससूत्र
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.