पिएरो दि लॉरेंझो दे मेदिची (१५ फेब्रुवारी, १४७२ – २८ डिसेंबर, १५०३) तथा कमनशिबी पिएरो हा १४९२-१४९४ दरम्यान इटलीमधील फिरेंझेच्या प्रजासत्ताकाचा शासक होता.
पिएरो लॉरेन्झो दे मेदिची (लोरेन्झो द मॅग्निफिसंट) आणि क्लॅरिचे ओर्सिनी यांचा मोठा मुलगा होता. तो त्याचा धाकटा भाऊ जिओव्हानी (पुढे जाता पोप लिओ दहावा) आणि चुलतभाऊ जुलियो (जो पुढे जाता पोप क्लेमेंट सातवा झाला) यांच्या सोबत वाढला होता. [1]
पिएरोला लहानपणापासून त्याच्या वडिलांच्या नंतर मेदिची कुटुंबप्रमुख आणि फिरेंझेचा शासक होण्यासाठी तयार केले गेले होते. यासाठी लॉरेंझोने अँजेलो पोलिझियानो आणि मार्सिलियो फिचिनो सह अनेक विद्वानांना त्याचे शिक्षक नेमले होते. सारख्या व्यक्तींच्या अंतर्गत झाले होते. तथापि तो दुर्बल, गर्विष्ठ आणि अनुशासनहीन होता आणि या पदासाठी अयोग्य असल्याचे कालांतराने कळून आले. पिएरोचे शिक्षक पोलिझियानो २४ सप्टेंबर, १४९४ रोजी विषबाधेने मृत्यू पावले. यामागे पिएरोचा हात असल्याचे समजले जाते. पिएरोचे त्याचे चुलत भाऊ, लॉरेन्झो आणि जियोव्हानी यांच्याशी सतत मतभेद होते, जे पिएरोपेक्षा मोठे आणि श्रीमंत होते. [5]
१४८६ मध्ये, पिएरोचे मामा बेर्नार्दो रुचेलाई यांनी तोस्कानामधील जहागीरदाराची मुलगी अल्फोन्सिना ओर्सिनीशी लग्न करण्यासाठी तिचे वडील रॉबेर्तो ओर्सिनी यांच्याशी पिएरोच्या वतीने वाटाघाटी केल्या आणि नंतर त्याच्यावतीने दूरस्थ लग्नही केले. पिएरो आणि अल्फोन्सिना १४८८ मध्ये भेटले. त्यांना तीन मुले झाली: क्लॅरिचे (सप्टेंबर १४८९-१५२८. हिने धाकट्या फिलिपो स्ट्रोझ्झी लग्न केले); लॉरेन्झो (सप्टेंबर १४९२-१५१९); आणि लुईसा (१४९४-अज्ञात). बाप्तिस्म्याच्या नोंदींवरून असे दिसते की फेब्रुवारी १४९२ मध्ये त्याला मारिया नावाची एक अनौरस मुलगी देखील होती.
लॉरेन्झोच्या मृत्यूनंतर पिएरो १४९२मध्ये फिरेंझेचा शासक झाला. लॉरेंझोने परिश्रमपूर्वक तयार केलेलाइटालियन राज्यांमधील नाजूक शांततापूर्ण समतोल थोडा काळ टिकून होता, १४९४ च्या सुमारास फ्रान्सचा राजा आठव्या शार्लने नापोलीच्या राज्यावर वंशपरंपरागत हक्क सांगत चढाई करण्याचे ठरवले. चार्ल्सला मिलानच्या राजकारणी लुदोविको स्फोर्झाने (लुडोविको इल मोरो) आमंत्रण आणि आमिष दिले होते.
मिलानमध्ये प्रकरणे मिटवल्यानंतर शार्लने आपली नजर नापोलीकडे वळवली. नापोलीवर हल्ला करण्यासाठी त्याला आपले सैन्य तोस्कानामधून नेणे आवश्यक होते तसेच मिलानमधून रसद आणि कुमक चालू ठेवण्यासाठी तोस्कानाचा प्रदेश त्याच्या अधिकारात असणेही गरजेचे होते. तोस्कानाजवळ आल्यावर शार्लने पिएरोला नापोलीवरील त्याच्या दाव्याचे समर्थन करण्यास आणि त्याच्या सैन्याला तोस्कानामधून पुढे जाण्याची परवानगी देण्यासाठी विनंती करण्यास फिरेंझेला दूत पाठवले. पिएरोने दूताला पाच दिवस ताटकळत ठेवून नंतर फिरेंझे तटस्थ राहील असे उत्तर पाठवले परंतु ही दिरंगाई अस्वीकार्य असल्याचे कारण सांगत शार्लने तोस्कानावरच हल्ला केला आणि फिविझ्झानोचा किल्ला काबीज करून तेथील शिबंदीची क्रूरपणे कत्लेआम केली.
पिएरोने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला परंतु धर्मांध डोमिनिकन धर्मगुरू गिरोलामो साव्होनारोलाच्या प्रभावाखाली आलेल्या फिरेंझेच्या उच्चभ्रू लोकांकडून त्याला फारसा पाठिंबा मिळाला नाही. त्याचे चुलत भाऊ लोरेन्झो आणि जियोव्हानी यांनीही चार्ल्सशी संधान बांधले आणि त्यांना पाठिंबा आणि खजिना देण्याचे संदेश पाठवले.
पिएरोने शार्लशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला आणि फिरेंझेच्या सिन्योरियाला न कळवताच तो शार्लला भेटायला गेला. तेथे पिएरोने शार्लच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आणि सार्झाना, पिएत्रासांता, सार्झानेलो आणि लिब्राफ्रात्ताचे किल्लेही शार्लच्या हवाली केले. याशिवाय त्याने पिसा आणि लिव्होर्नो शहरेही शार्लला दिली यानंतर पिएरो फिरेंझेला परत आला तेव्हा त्याच्याविरुद्ध लोकक्षोभ उसळला. याला घाबरून पिएरो आपल्या कुटुंबाला घेउन फिरेंझेहून व्हेनिसला पळून गेला. शहरातील जमावाने त्याचा महाल लुटला व मेदिची कुटुंबाला फिरेंझेमधून हद्दपार करून पुन्हा एकदा प्रजासत्ताक स्थापन केले. यानंतर १५१२पर्यंत पोप लिओ दहाव्याने फिरेंझे पुन्हा जिंकून घेईपर्यंत मेदिचींना फिरेंझेमध्ये स्थान नव्हते.
१५०३मध्ये गॅरिलियानोच्या लढाईनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नान पिएरो गारिलियानो नदीत बुडुन मृत्यू पावला. त्याला माँते कॅसिनोच्या मठात दफन करण्यात आले.
पिएरो दि लॉरेंझो दे मेदिची
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.