महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडी व तुमसर तालुक्याच्या सीमेवर रामटेक- तिरोडा -गोंदिया राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ (NH-753) पासून १ किमी अंतरावर वैनगंगा नदीच्या अथांग पात्रात वसलेले माडगी येथील प्रसिद्ध नृसिंह (नरसिंह टेकडी) मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मोहाडी तालुक्यातील देव्हाडा बु व तुमसर तालुक्यातील माडगी येथील हे नृसिंह मंदिर बहुधा विदर्भातील एकमेव असावे. भंडारा जिल्ह्यात हे तीर्थक्षेत्र मिनी पंढरी म्हणूनही ओळखले जाते. नृसिंह टेकडीला पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने 'क श्रेणी'चा दर्जा प्राप्त आहे. वैनगंगेच्या पात्रात कुशीत मोठ्या दगडांच्या टेकडीवर हे मंदिर आहे. येथील सिंदुरचर्चीत भव्य व तेजस्वी अशी भगवान नृसिंहाची व लक्ष्मीची स्वयंभू तेजस्वी मूर्ती भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मुख्य दरवाजातून सरळ आत गेल्यास एक हवनकुंड आहे. हवनकुंडाच्या बाजूने काही पायऱ्या चढून वर गेल्यानंतर मंदिर आहे. हे मंदिर तळघरासारखे भासते. तेथे दाराजवळ उजवीकडे हनुमंताची मूर्ती आहे. समोर नृसिंह भगवानाची पाच फूट उंच विशाल मूर्ती दिसते. जवळ खिडकीतून भगवंताच्या मूर्तीवर सूर्यप्रकाश पडून ती अधिक विलोभनीय दिसते. याच मंदिरात गणपती, आदिशक्ती दुर्गा देवी, अन्नपूर्णा देवी यांच्या पुरातन मूर्ती आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नृसिंह टेकडी
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.