डॉ. दाजी भाटवडेकर ऊर्फ केशवचंद्र मोरेश्वर भाटवडेकर (सप्टेंबर १५ १९२१ - डिसेंबर २६, २००६) हे मराठीतील प्रसिद्ध नाट्यअभिनेते होते. मराठी रंगभूमीबरोबरच इंग्रजी, संस्कृत आणि हिंदी रंगभूमीवरही त्यांनी काम केले.
दाजी भाटवडेकर मूळचे मुंबईचे. स्वातंत्र्यपूर्व काळात दाजींचे आजोबा मुंबईतील एक प्रख्यात डॉक्टर होते. त्याकाळी त्यांना मुंबईचे महापौरपदही मिळाले होते. त्यांचे घराणे संपन्न असले तरी घरांत धार्मिक आणि संस्कृती जपणारे वातावरण होते.दर एकादशीला घरात कीर्तन आणि भजनाचा कार्यक्रम होत असे. दर पंधरवड्याला होणाऱ्या असल्या कार्यक्रमातील नाट्याचा आणि कथानकांचा दाजींच्या मनावर खोल परिणाम झाला. ते कीर्तनकार बुबांच्या आवाजाची आणि बोलण्याच्या ढंगाची हुबेहूब नक्कल करीत असत. अगदी बालवयात म्हणजे वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी गिरगावातल्या ब्राह्मणसभेत तासभर कीर्तन करून "बालकीर्तनकार' असा लौकिक दाजींनी मिळवला होता. पुढे आर्यन हायस्कूलमध्येही अनेक वर्षे कृष्ण जयंतीला त्यांचे कीर्तन होत असे. नाशिकला गोऱ्या रामाच्या देवळातही त्यांचे कीर्तन झाले होते. १९४४मध्ये संस्कृत विषय घेऊन एम. ए. झाल्यावर मुंबईच्या ब्राह्मणसभेत केलेल्या कीर्तनानंतर त्यांनी कीर्तनात गुंतून न राहण्याचे ठरवले. त्यामंतर भरदार आवाजाची देणगी मिळालेल्या दाजींनी संगीत नाटकांत भूमिका करायला सुरुवात केली.
दाजींच्या दुर्दैवाने पुढे मराठी संगीत रंगभूमीला उतरती कळा लागली. संभाषणात नाटकी अभिनिवेशाने बोलण्याच्या जागी वास्तव शैलीने बोलायची पद्धत पडू लागली. मग दाजींनी आपला मोहरा संस्कृत रंगभूमीकडे वळवला. दाजी स्वतः उच्चशिक्षित आणि संस्कृत नाटकांचे गाढे अभ्यासक असल्याने त्यांना संस्कृत रंगभूमीची चळवळ सुरू करायला फारशी अडचण पडली नाही.. मुंबईच्या ब्राह्मण सभेत त्यांनी १९५० ते १९८० या काळात दर वर्षाला एक नवे संस्कृत नाटक रंगभूमीवर आणले. कालिदास महोत्सवाच्या काळात दाजींनी ’अभिज्ञानशाकुंतल’ या संस्कृत नाटकाचा प्रयोग भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि अन्य सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीत सादर करून वाहवा मिळवली. रंगभूमीवर त्यांनी केवळ संस्कृत नाटकेच केली नाहीत, तर गाजलेल्या मराठी नाटकांचे संस्कृतमध्ये रूपांतर करून त्याचे प्रयोगही केले.
संस्कृत नाटकांनाही पुढे प्रेक्षक मिळेनासे झाले. मात्र, ही नाटके सादर करताना काय काय अनुभव आणि अडचणी आल्या यावर दाजींनी लिहिलेला प्रबंध मुंबई विद्यापीठाने स्वीकारून त्यांनी डॉक्टरेट दिली.
व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी ४० नाटकांत एकूण ५० भूमिका साकार केल्या. तुझे आहे तुजपाशी या नाटकातील "काकाजी' ही भूमिका त्यांनी अजरामर केली. दाजी भाटवडेकरानंतर ती भूमिका तेवढ्या ताकदीने कुठलाही अभिनेता करू शकलेला नाही.
"घर गंगेच्या काठी' हा चित्रपट आणि अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या जीवनावरील श्री स्वामी समर्थांची भूमिका यांसारख्या त्यांच्या चित्रपटांतील भूमिकाही गाजल्या. दूरदर्शनवरील मालिकांमधूनही ते चमकले. आकाशवाणीच्या अनेक श्रुतिकांमधूनही त्यांनी कामे केली. आपल्या सुमारे ६५ वर्षांहूनही अधिक काळातील नाट्य कारकिर्दीत त्यांनी सत्तराहून अधिक भूमिका केल्या. केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य तसेच राज्य रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. अनेक पुरस्कारही त्यांच्याकडे चालत आले.
दाजी भाटवडेकर
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!