दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने जून - जुलै २०२१ दरम्यान दोन कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. दक्षिण आफ्रिकेने २०१० नंतर पहिल्यांदाच वेस्ट इंडीजमध्ये कसोटी मालिका खेळली. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धे अंतर्गत खेळविली गेली.
कसोटी सामने सेंट लुसिया मधील डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले गेले तर सर्व ट्वेंटी२० सामने ग्रेनेडा मधील राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयोजित करण्यात आले होते. पहिली कसोटी दक्षिण आफ्रिकेने जिंकत दौऱ्याची विजयाने सुरुवात केली. दुसरी कसोटी देखील १५८ धावांच्या फरकाने जिंकत दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० ने विजय नोंदवला. २ऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराज ने हॅट्रीक घेतली. केशव हा कसोटीमध्ये हॅट्रीक घेणारा दक्षिण आफ्रिकेचा दुसरा खेळाडू ठरला. या आधी जॉफ ग्रिफिन ने २४ जून १९६० रोजी लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडविरुद्ध हॅट्रीक घेतली होती.
वेस्ट इंडीजने पहिली ट्वेंटी२० जिंकत मालिकेत आघाडी घेतली खरी पण दुसऱ्या ट्वेंटी२०त दक्षिण आफ्रिकेने पुनरागमन करत मालिका १-१ अशी बरोबरीत आणून ठेवली. २९ जून २०२१ रोजी तिसऱ्या ट्वेंटी२० सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे दिवंगत व्यवस्थापक गुलाम राजा यांच्या स्मरणार्थ दक्षिण आफ्रिका संघ काळ्या पट्ट्या दंडाला बांधून मैदानात उतरला. दोन्ही संघांनी दोन मिनिटांचे मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तोच सामना दक्षिण आफ्रिकेने १ धावेने जिंकला. तबरेझ शम्सी याने दक्षिण आफ्रिकेचा विजय गुलाम राजांना समर्पित केला. लागोपाठ दोन सामने जिंकत दक्षिण आफ्रिकेने २-१ ने आघाडी मिळवली. चौथा सामना वेस्ट इंडीजने जिंकत मालिका पुन्हा २-२ अश्या बरोबरीच्या टप्प्यात आणून ठेवली. पाचव्या आणि निर्णायक ट्वेंटी२० सामन्यात एडन मार्करम याच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पाच सामन्यांची ट्वेंटी२० मालिका ३-२ ने जिंकली.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२१
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.