तांडा हा बंजारा भाषिकांचा एक स्वतंत्र लोकसमुह असतो. जेथे बंजारा समाजाचे लोक राहतात त्याला "तांडा" म्हणतात. गौर बंजारा संस्कृतीचा दर्पण म्हणून तांडा ओळखला जातो. तांडा व्यवस्थेचे अभ्यासक , प्रख्यात साहित्यिक एकनाथ पवार-नायक यांच्या मते , "तांडा म्हणजे प्राकृतिक सृजनतेला , मानवी मूल्याला गती, निरंतरता प्रदान करणारी आणि संरक्षित करणारी एक स्वतंत्र आदिम व्यवस्था होय." तांडा म्हणजे ऐतिहासिक व वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती जोपासणाऱ्या बंजारा समाजाची लोक वसाहत आहे, अशा विविध व्याख्या तांडा बाबत दिसून येते. बंजारा साहित्य मध्ये तांड्याबाबत विपुल लेखन दिसून येते. तांडयाच्या प्रमुखाला नाईक (नायक) असे म्हणतात. तर त्यांच्या सोबतीला कारभारी, हासाबी, नसाबी व डायसांळ असे प्रमुख गणमान्य व्यक्ती असतात. तांड्याची समृद्ध अशी स्वतंत्र व्यवस्था असून प्रकृतीपुजक , मानवतावादी आणि विवेकवादावर अधिक भर असल्याने आजही तांडयात हजारो वर्षांपासून सुरू असलेली वैश्विक कल्याणाची 'सेनं सायी वेस' ही सामुदायिक आराधना केली जाते. तांडा बहुतांशी निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले आहे. तांडयात गोर बंजारा भाषा बोलली जाते. ब्रिटीशाच्या विरोधी धोरणामुळे वैभवशाली बंजारा व्यवस्था कोलमडून पडली होती. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय कृषीक्रांतीचे प्रणेते व थोर समाजसुधारक महानायक वसंतराव नाईक यांच्या परिश्रमाने तांडा स्थिरावल्याचे दिसून येते. पूर्वी बंजारा समाजाचा व्यापार हा फक्त भारतभर नव्हता , तर युरोपियन देशापर्यंत चालत असे. त्यामुळे बंजारा समाजाला भारतातील पहिले व्यापारी म्हणूनही ओळखले जात असे. महान योद्धा व जगातील सर्वात मोठा "लोहगड" किल्ला उभारणारे शूरवीर, तसेच आशिया खंडातील सर्वात मोठे व्यापारी म्हणून ओळख असलेले बाबा लखीशाह बंजारा यांचा जगभर आजही उल्लेख होतो. शाह यांचा अर्थ 'राजा' असा होतो. लखीराय यांचे दिल्लीस्थित मालचा, रकाबगंज, बारखंबा, रायसिना हे अतिशय समृद्ध तांडा वसाहती त्यांच्या अधिपत्याखाली होते. आज जरी तांड्याला गावाच्या नावाने ओळखले जाते, परंतु त्यांची खरी ओळख बंजारा संस्कृतीत तांडा म्हणूनच होते.(उदा. गहुली तांडा, कुंटुर तांडा, बारड तांडा, वरोली तांडा, मांडवी तांडा ई.) तर पूर्वी मात्र नायकाच्या नावाने ओळखले जायचे (उदा. भिमा नायकेर तांडो, लाखा रायरो तांडो, फुलसिंग बापूर तांडो, रामजी नायकेर तांडो). तांडा म्हणजे बंजारा गोरमाटीचा गड-किल्ला मानला जाते. तांडयाला 'गड' म्हणूनही संबोधले जाते. उदा. गहुलीगड, गडमंगरूळ, सेवागड, उमरीगड, रूईगड, लाखागड, पोहरागड, वसंतगड.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तांडा
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.