बंजारा

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

बंजारा संस्कृती ही अति प्राचीन असून 'गोर' हा एक प्राचीन क्षत्रिय वंश आहे. त्याचा हिंदीमध्ये 'गौर' तर इंग्रजीमध्ये असा Gour/Gor असा उल्लेख होतो. गौर या शब्दाचा मराठीत 'गोर' असाही उल्लेख होतो. गौरराजवंशीय लोकांना गोरबंजारा असे म्हणले जाते. हा एक समृद्ध सांस्कृतिक परंपरा असणारा भारतीय समाज रचनेचा एक महत्त्वाचा घटक होय.भारतीय विविधतेतील एक स्वतंत्र संस्कृती जोपासणारा समाज म्हणून बंजारा समाजाकडे बघितल्या जाते. काटक, लढवय्या, साहसी व निसर्गप्रेमी अशी त्यांची खरी ओळख. त्यांचे पुर्वीचे मुख्य स्थान राजपुताना, मारवाड मानले जाते. मोहम्मद घोरीच्या आक्रमणानंतर राजपुतानाचे जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे गौर बंजारा समुह व उपसमुहाच्या अनेक टोळया राजस्थानमधून दक्षिण मध्य, उत्तर भारतातील काही राज्यामध्ये तर काहींनी महाराष्ट्र(विदर्भ), गुजरात व मध्यप्रदेश मध्ये येऊन वेगवेगळ्या नावांनी राहू लागली. महाराणा प्रताप सोबत यातील गौर बंजारा टोळ्या जंगलात गेल्या आणि जंगलात आपले बस्तान त्यांनी बसविले. गोर बंजारा हे राजपूताची एक शाखा असल्याचे अनेक इतिहासकारांचे मत आहे. तसेच महाराष्ट्रातील विदर्भात इसवी सन 16 व्या शतकापासून बंजारा समाजाचे अस्तित्व असल्याचे दिसून येते. विदर्भ ह्या भागात वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, बुलढाणा ह्या भागात बंजारा समाजाच अस्तित्व पूर्वापार पासून राहिलेलं आहे. बंजारा हा एक क्षत्रिय समाज असून त्यांनी अनेक ऐतिहासिक लढाया लढल्या आहेत.विदर्भ भागाला एक प्रकारे बंजारा समाजाची राजधानी म्हटले जाऊ शकते. क्षत्रिय बंजारा हे विदर्भात वेगवेगळ्या भागात राहिले आहेत. क्षत्रिय बंजारा समाज हा विदर्भात राहिला असून त्यांचे वर्चस्व त्या-त्या प्रदेशावर राहिले आहेत.

गोर बंजारा समाजासाठी 'गोरमाटी' असाही एक शब्दप्रयोग केला जातो. 'मातीशी जुळलेला माणूस' , 'मातीशी नातं ठेवणारा माणूस' म्हणजे गोरमाटी. हिंदी , राजस्थानी भाषेत 'गौर' नावाने उल्लेख होतो. गौरमाटीला गोरमाटी हा शब्दप्रयोग बंजारा बांधव आपल्या स्वकीयांसाठीच करताना दिसतात. तसेच बंजारा हा शब्द आपल्या भारतीयांना अपरिचित आहे असे मुळीच नाही. अनेक सिनेगीतातून, हिंदी काव्यरचना इत्यादींमधून 'बंजारा' या शब्दाचा उल्लेख विविध ठिकाणी आपणास सापडतो. 'बंजारा' लोकगणातील राजवंशीसाठी 'गौर बंजारा' असा शब्द प्रयोग होताना दिसतो. या शब्दाचा शब्दशः अर्थ म्हणजे 'गौर क्षत्रिय असलेल्या या लढवय्या समाजाचे साम्राज्य अस्तास आल्यानंतर रानावनात गेला' असा होतो. कालांतराने 'बंजारा' हा शब्द रुढ झाला असे निष्कर्ष अनेक इतिहास संशोधकांनी काढलेली आहे.

मुळ राजपुताना मधला वैभवशाली इतिहास व संस्कृती असणाऱा हा समाज कालांतराने भारतात वेगवेगळ्या राज्यांत, भौगोलिक प्रदेशात आपल्या विविध व्यवसायावरून गौर-बंजारा', 'गोरमाटी', 'बाजीगर', 'नायक' , राजपूत बंजारा , 'बंजारा' इत्यादी नावाने ओळखला जातो. परंतु या समुदातातील विविध उपसमुहाचे व्यवसाय पूर्वी जरी भिन्न होते, परंतु यातील अनेक उपसमुह हे स्वतः बंजारा नाव धारण केल्याने बंजारा म्हणून ओळखू लागली. गौरबंजारा ही क्षत्रिय जमात असून यात अनेक शूरवीर, छोट्या छोट्या भूभागाचे साम्राज्याचे अधिपती असल्याचे संदर्भ ही इतिहासात सापडतो. आपली वैभवशाली संस्कृती आणि इतिहास आजही या समाजाने जपल्याचे दिसून येते. नेतृत्व करणारा समाज , निडरपणे लढणारा यावरून बंजारा समाजाला 'नायक' असे म्हणतात. तसेच तांडा वसाहतीच्या प्रमुखांना सुद्धा 'नायक किंवा नाईक' असे म्हणले जाते. आजमितीला बंजारा समाज हा भारतातील जवळ जवळ सर्वच राज्यांमध्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये कमी-अधिक प्रमाणात वास्तव्यास असल्याचे पहावयास मिळते. बंजारा भाषा , बंजारा संस्कृती , बंजारा समाज, बंजारा साहित्य अशा स्वरूपात 'बंजारा' याच नावाने सध्या ओळखले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →