चंद्रा क्ष-किरण वेधशाळा

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

चंद्रा क्ष-किरण वेधशाळा

चंद्रा क्ष-किरण वेधशाळा (Chandra X-ray Observatory) ही कृत्रिम उपग्रहाच्या स्वरूपातली एक अवकाशीय वेधशाळा आहे. २३ जुलै १९९९ रोजी एसटीएस-९३ मोहिमेमध्ये नासाच्या कोलंबिया अंतराळयानाने हिचे प्रक्षेपण करण्यात आले होते. ६४ तासामध्ये ही वेधशाळा पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा करते. या वेधशाळेमध्ये एक क्ष-किरण दुर्बीण आहे. तिच्यातील आरशांच्या उच्च कोनीय विभेदनामुळे ती तिच्यापूर्वीच्या इतर कुठल्याही क्ष-किरण दुर्बिणीपेक्षा १०० पटींनी जास्त संवेदनशील आहे. पृथ्वीचे वातावरण बहुतांश क्ष-किरणे शोषून घेते. त्यामुळे जमिनीवरील दुर्बिणींनी क्ष-किरणांचे निरीक्षण करता येत नाही. म्हणून अवकाशीय वेधशाळेची गरज भासते. ही दुर्बीण सध्या (२०१६ मध्ये) कार्यरत आहे.

चंद्रा वेधशाळा नासाच्या चार महान वेधशाळांमधील तिसरी वेधशाळा आहे. यामधील सर्वात पहिली हबल दुर्बीण, दुसरी इ.स. १९९१ मध्ये प्रक्षेपित करण्यात आलेली कॉम्प्टन गॅमा किरण वेधशाळा आणि चौथी स्पिट्झर अवकाश दुर्बीण आहे.

चंद्रा या दुर्बिणीचे नाव भारतीय-अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ सुब्रह्मण्यन चंद्रशेखर यांच्या सन्मानार्थ देण्यात आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →