हानले हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातल्या लेह जिल्ह्यातील एक गाव आहे. ते १७व्या शतकातील हानले बौद्ध मठाचे स्थान आहे. हा मठ हानले खोऱ्यात असून तो जुन्या तिबेट-लडाख व्यापारी मार्गावर आहे. हानले खोऱ्यात जवळपास एक हजार लोक राहतात, तर हानले गावात ३०० लोक राहतात.
मंगोलांविरुद्धच्या एका मोहिमेवरून परतताना सेंगे नमग्याल याचा हानले इथे मृत्यू झाला होता. मंगोलांनी तिबेटमधील त्सांग प्रदेशाचा ताबा मिळवल्याने त्यांच्यापासून लडाखला धोका निर्माण झाला होता.
हानलेमध्ये भारतीय खगोलशास्त्रीय वेधशाळासुद्धा आहे. हानले गावाचे आणि वेधशाळेचे ठिकाण तिबेट/चीनच्या सीमेजवळ असल्याने संवेदनशील भागात येते. त्यामुळे तिथे जाण्यासाठी भारत सरकारची विशेष परवानगी घ्यावी लागते. फुक्चे विमानतळ हानलेपासून २४ किमी अंतरावर आहे आणि उकडुंगले हे लष्करी तळ तिथून जवळ आहे. तेथे भारतीय खगोलशास्त्रीय वेधशाळेची २ मीटर व्यासाची हिमालयन चंद्रा दुर्बीण आहे. त्याचबरोबर तिथे हाय एनर्जी गॅमा रे टेलिस्कोप (हगार) ही गॅमा किरणांचा अभ्यास करणारी एक दुर्बीण आहे. ही दुर्बीण जगातील समुद्रसपाटीपासून सर्वाधिक उंचीवर असलेली दुर्बीण आहे. नामिबियातील हाय एनर्जी स्टिरिओस्कोपिक सिस्टिम (हेस) या दुर्बिणीच्या खालोखाल ही जगातील दुसरी सर्वात मोठी गॅमा किरण दुर्बीण आहे.
हानले
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?