दीर्घिकेच्या केंद्रकाभोवती उपग्रहाप्रमाणे फिरणाऱ्या ताऱ्यांचा गोलाकार समूह म्हणजे गोलाकार तारकागुच्छ(Globular Cluster). गोलाकार तारकागुच्छ हे गुरुत्वीय बलाने घट्ट बांधलेले असतात, त्यामुळे त्यांना त्यांचा गोल आकार मिळतो. त्यांतील ताऱ्यांची घनता केंद्राकडे वाढत गेलेली असते.
दीर्घिकेच्या तेजोमंडलात आढळणाऱ्या गोलाकार तारकागुच्छांमध्ये दीर्घिकेच्या तबकडीमध्ये आढळणाऱ्या खुल्या तारकागुच्छांपेक्षा बरेच जास्त आणि जुने तारे असतात. आकाशगंगेमध्ये सध्या माहित असलेले १५० ते १५८ आणि अद्याप शोध न लागलेले आणखी १० ते २० गोलाकार तारकागुच्छ असण्याची शक्यता आहे. हे तारकागुच्छ दीर्घिकेभोवती ४० किलोपार्सेक (१,३०,००० प्रकाशवर्षे) किंवा त्यापेक्षा जास्त त्रिज्येच्या कक्षेमध्ये फिरतात. देवयानी सारख्या मोठ्या दीर्घिकेमध्ये आणखी जास्त म्हणजे ५०० गोलाकार तारकागुच्छ असू शकतात. एम८७ सारख्या काही मोठ्या लंबवर्तुळाकार दीर्घिकांमध्ये १३,००० गोलाकार तारकागुच्छ आहेत.
स्थानिक समूहातील पुरेशा वस्तुमानाच्या प्रत्येक दीर्घिकेमध्ये आणि जवळपास प्रत्येक मोठ्या दीर्घिकेमध्ये गोलाकार तारकागुच्छ आढळले आहेत. धनू बटू दीर्घिका आणि बृहललुब्धक बटू दीर्घिका त्यांचे गोलाकार तारकागुच्छ आकाशगंगेला देण्याच्या प्रक्रियेत आहेत. यावरून असे सूचित होते की आकाशगंगेने यापूर्वीही काही गोलाकार तारकागुच्छ या दीर्घिकांकडून मिळवले असावेत.
गोलाकार तारकागुच्छांमध्ये दीर्घिकांमध्ये तयार होणारे सर्वात पहिले तारे असतात असे मानले जाते. असे असले तरी त्यांची निर्मिती आणि त्यांचे दीर्घिकांच्या उत्क्रांतीमधील भूमिका अस्पष्ट आहे.
गोलाकार तारकागुच्छ
यामागील विज्ञान आणि इतिहास.