वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी (इंग्रजी: Cosmic Microwave Background) हे विश्वामध्ये सगळीकडे पसरलेले उष्णता प्रारण आहे. पारंपरिक दृश्य वर्णपटातील दुर्बिणीने आकाशात पाहिले, की काही ठिकाणी तारे, दीर्घिका दिसतात व इतरत्र अंधार दिसतो. पण पुरेश्या संवेदनशील रेडिओ दुर्बिणीने पाहिले असता सर्व दिशांना जवळपास समान तीव्रतेचा मंद प्रकाश दिसतो., ज्याचा तारे व दीर्घिकांशी संबंध नाही असा हा प्रकाश म्हणजेच वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी प्रारण आहे. या प्रकाशाची तीव्रता मायक्रोवेव्ह तरंगलांबींमध्ये सर्वात जास्त आहे. अमेरिकन रेडिओ खगोलशास्त्रज्ञ आर्नो पेंझियाज आणि रॉबर्ट विल्सन यानी अनपेक्षितपणे १९६४ साली या प्रारणाचा शोध लावला. या शोधासाठी त्यांना १९७८ साली नोबेल पारितोषिक देण्यात आले.

वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी प्रारण हे विश्वाच्या विकासाच्या सुरुवातीच्या काळातील शिल्लक राहिलेले प्रारण आहे. हे प्रारण हा महास्फोट सिद्धान्ताचा पुरावा मानला जातो. विश्व अगदी सुरुवातीच्या काळात म्हंणजे ताऱ्यांच्या व ग्रहांच्या निर्मितीच्या आधी, अतिशय घन व उष्ण होते आणि ते हायड्रोजन प्लाझ्माच्या धुक्याने व एकसारख्या तीव्र प्रारणाने भरले होते. जसे विश्व प्रसरण पावले, तसे हायड्रोजन प्लाझ्मा आणि प्रारण थंड होत गेले. विश्व पुरेसे थंड झाल्यावर प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन एकत्र आले व हायड्रोजन अणू तयार झाले. हे अणू भोवतालचे औष्णिक प्रारण शोषू शकत नव्हते. त्यामूळे विश्व अपारदर्शक धुक्याऐवजी पारदर्शक बनले. हे प्रारण म्हणजे वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी प्रारण पुढे विश्वामध्ये प्रसार पावत राहिले. जसे विश्व प्रसरण पावले, तसे त्याची तीव्रता व ऊर्जा कमी होत गेली.

वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमीचे अचूक मोजमाप विश्वनिर्माणशास्त्रासाठी अतिशय महत्त्वाचे आहे, कारण विश्वाच्या प्रत्येक मॉडेलला या प्रारणाचे स्पष्टीकरण देता आलेच पाहिजे. वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी प्रारणाचा वर्णपट २.७२५४८ ± ०.०००५७ केल्व्हिन या तापमानाचा औष्णिक ब्लॅक बॉडी वर्णपट आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →