कुतूहलापोटी हे डॉ. अनिल अवचट यांचे ३८वे पुस्तक आहे.
‘कुतूहलापोटी’मध्ये चराचर सृष्टीच्या गोष्टींविषयी आपल्याला वाटणाऱ्या कुतूहलावरील लेख आहेत. या लेखांत प्राणी, कीटक, बुरशी, बॅक्टेरियासारख्या सूक्ष्म जीवांपासून ते विस्मयकारक अशा आपल्या मानवी शरीररचनेपर्यंतची माहिती आहे. ही माहिती रंजक व चकित करणारी आहे. या चराचर सृष्टीचा मी एक अविभाज्य भाग आहे, माझी नाळ या सर्वाशी जोडली आहे, मानवी अस्तित्त्व हे स्वयंभू, स्वायत्त आणि स्वतंत्र नाही, ही ती निसर्गजाणीव असून अशा जाणीवजागृतीच्या अनेक क्षणांची प्रचीती या लेखनात येते.
‘कुतूहलापोटी’ या पुस्तकातील सर्वच लेख माहितीपर आहेत, पण त्या माहितीला माहिती मिळविण्याच्या खास अवचट पद्धतीने वजन आले आहे. अवचटांनी लिहिलेले विविध विषयांवरील लेख त्या क्षेत्रातील गुरू, तज्ज्ञ, अभ्यासक, संशोधक, त्या क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून आणि त्या जोडीला माहितीजालावरून माहिती मिळवून लिहिले गेले आहेत.
माहितीवरील प्रक्रिया करणे यात अवचटांचे वेगळेपण आहे. माहिती घ्यायची, ती मनात रुजू द्यायची, त्यातून निवड करायची, आपल्या परिप्रेक्ष्याला अनुरूप असेल तिला प्राधान्य द्यायचे, अनेक गाळण्यांतून, निकषांतून ती तावूनसुलाखून निघते आणि मगच त्याचा अवचट शैलीतील लेख होतो.
कुतूहलापोटी (पुस्तक)
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.