आशियाई क्रिकेट परिषद आशिया चषक ही पुरुषांची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट स्पर्धा आहे. आशियाई देशांमधील सद्भावना वाढवण्यासाठी आशिया क्रिकेट समितीची स्थापना १९८३ मध्ये करण्यात आल्यानंतर सदर स्पर्धा सुरू करण्यात आली. ही स्पर्धा सुरुवातीला दर दोन वर्षांनी होणार होती. आशिया चषक ही क्रिकेटमधील एकमेव महाद्वीपीय चॅम्पियनशिप आहे आणि जिंकणारा संघ आशिया खंडाचा चॅम्पियन बनतो. स्पर्धेचे स्वरूप हे दर २ वर्षांनी एकदिवसीय आणि टी२० असे बदलते.
पहिला आशिया चषक १९८२ मध्ये संयुक्त अरब अमिरातीमधील शारजा येथे आयोजित करण्यात आला होता जेथे परिषदेचे कार्यालय (१९९५ पर्यंत) होते . श्रीलंकेसोबतच्या ताणलेल्या क्रिकेट संबंधांमुळे भारताने १९८६ च्या स्पर्धेवर बहिष्कार टाकला होता. भारतासोबतच्या तणावपूर्ण राजकीय संबंधांमुळे पाकिस्तानने १९९०-९१ च्या स्पर्धेवर बहिष्कार टाकला आणि त्याच कारणास्तव १९९३ ची स्पर्धा रद्द करण्यात आली. एसीसी ने घोषणा केली की २००९ पासून ही स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाईल. आशिया चषक स्पर्धेमध्ये खेळल्या जाणाऱ्या सर्व सामन्यांना अधिकृत एकदिवसीय सामन्यांचा दर्जा असल्याचा निर्णय आयसीसीने दिला आहे.
२०१५ मध्ये आशियाई क्रिकेट परिषदेचा आकार कमी केल्यानंतर, आयसीसीने जाहीर केले की २०१६ पासून आशिया चषक स्पर्धा आगामी जागतिक स्पर्धांच्या स्वरूपाच्या आधारावर, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय टी२० स्वरूपात आळीपाळीने खेळवली जाईल. परिणामी, २०१६ ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय टी२० स्वरूपामध्ये खेळवली गेलेली पहिली स्पर्धा होती आणि २०१६ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०च्या आधी एक तयारी स्पर्धा म्हणून कार्य करते.
सात विजेतेपदांसह (सहा एकदिवसीय आणि एक टी-२०) भारत हा स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. तर सहावेळा स्पर्धेचे विजेतेपद मिळवून श्रीलंका दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी संघ आहे. श्रीलंकेचा संघ सर्वाधिक १४ वेळा आशिया चषक स्पर्धेत सहभागी झाला आहे, त्यानंतर भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशने प्रत्येकी १३ स्पर्धांमध्ये खेळले आहेत. श्रीलंकेने सर्वात अलीकडील २०२२चा आशिया चषक जिंकला.
आशिया चषक
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.