भारत लंडन मध्ये होणाऱ्या २०१२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत २७ जुलै ते १२ ऑगस्ट २०१२ दरम्यान सामील झाला. भारतीय ऑलिंपिक संघाने आतापर्यंतचा सर्वात मोठा असा ८३ खेळाडूंचा संघ २०१२ उन्हाळी ऑलिंपिकसाठी पाठवला होता, १३ खेळांतील ५५ क्रीडा प्रकारांमध्ये या Mघातील खेळाडूंनी भाग घेतला. सुशील कुमार हा उद्घाटन समारंभात तर मेरी कोम ही सांगता समारंभात ध्वजधारक होती.
भारतीय खेळाडूंच्या तयारीसाठी भारत सरकारकडून सुमारे ४.८ कोटी अमेरिकी डॉलर्स खर्च करण्यात आले, तर खाजगी पुरस्कारकर्त्यांकडून सुमारे एक कोटी अमेरिकी डॉलर्स मिळाले. अजित पाल सिंग यांना भारतीय ऑलंपिक असोशिएशनने २ एप्रिल २०१२ रोजी चेफ डी मिशन म्हणून नियुक्त केले.
भारताने २ रौप्य आणि ४ कांस्य पदकांसहित ६ पदके जिंकली. ही भारताची पदकसंख्येनुसार आजवरची ऑलिंपिक खेळांमधली सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली.
गगन नारंगने भारतासाठी पहिले कांस्य पदक १० मी एर रायफल या क्रीडाप्रकारात मिळविले.
विजय कुमारने २५ मी रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात रौप्य पदक मिळविले. वैयक्तिक रौप्य पदक मिळविणारा तो नॉर्मन प्रितचार्ड आणि राज्यवर्धनसिंग राठोड यांच्या नंतर तिसरा भारतीय ठरला.
सायना नेहवाल हिला महिला एकेरी बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक मिळाले. ती बॅडमिंटनमध्ये ऑलिंपिक पदक मिळविणारी पहिली भारतीय आहे. तसेच २००० उन्हाळी ऑलिंपिकच्या वेटलिफ्टिंगमध्ये कांस्य पदक मिळविणाऱ्या कर्णम मल्लेस्वरी हिच्या नंतरची वैयक्तिक पदक मिळविणारी दुसरी भारतीय महिला आहे.
मेरी कोम हिने भारतासाठी चौथे पदक मिळविले. तिला ५१ किलो महिला फ्लायवेट बॉक्सिंग प्रकारात कांस्य पदक मिळाले.
योगेश्वर दत्तला ६० किलो फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये मिळालेले कांस्य पदक हे भारताचे चौथे कांस्य पदक तर एकूण पाचवे पदक. हे कुस्तीमधील भारताचे सुशिल कुमारला २००८ मध्ये आणि खाशाबा जाधव यांना १९५२ मध्ये मिळालेल्या पदकांनंतरचे तिसरे वैयक्तिक पदक होते.
यानंतर सुशील कुमारने ६६ किलो फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये रौप्य पदक मिळवीत, दोन लागोपाठ ऑलिंपिक खेळांत वैयक्तिक पदक मिळविणारा पहिला भारतीय होण्याचा बहुमान मिळविला.
२०१२ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.