हुन सेन

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

हुन सेन

हुन सेन (५ ऑगस्ट १९५२) हे एक कंबोडियन राजकारणी आणि माजी लष्करी अधिकारी आहेत. हे सध्या कंबोडियाच्या सेनेटचे अध्यक्ष आहेत. हे यापूर्वी (१९८५–१९९३), (१९९३–१९९८) आणि पुन्हा (१९९८–२०२३) दरम्यान कंबोडियाचे पंतप्रधान होते. हुन सेन हे कंबोडियाच्या इतिहासातील सर्वात प्रदीर्घ काळ सत्तेवर असलेले नेते आहेत. ते कंबोडियन पीपल्स पार्टीचे (सीपीपी, पूर्वीची कांपुचियन पीपल्स रिव्होल्युशनरी पार्टी (केपीआरपी)) अध्यक्ष आहेत. या पक्षाने १९७९ पासून कंबोडियावर राज्य केले आहे. सेन २०२४ पासून सेनेटचे सदस्य आहेत.

यांचे मूळ नाव हुन बुनाल आहे. त्यांनी १९७२ पासून दोन वर्षे ख्मेर रूजचे सैनिक म्हणून लढल्यावर आपले नाव बदलले. त्यांनी कंबोडियन यादवी युद्धात ख्मेर रूजकडून भाग घेतला आणि १९७७ मध्ये व्हिएतनामी दलांसोबत कंबोडियन-व्हिएतनामी युद्धात लढण्यापूर्वी ते डेमोक्रॅटिक कांपुचियामध्ये बटालियन कमांडर होते. १९७९ ते १९८६ आणि पुन्हा १९८७ ते १९९० पर्यंत त्यांनी व्हिएतनामने स्थापन केलेल्या कळसूत्री सरकारमध्ये कंबोडियाचे परराष्ट्र मंत्री म्हणून काम केले. वयाच्या २६ व्या वर्षी ते जगातील सर्वात तरुण परराष्ट्र मंत्री होते.

जानेवारी १९८५ मध्ये एकपक्षीय नॅशनल असेंब्लीने डिसेंबर १९८४ मध्ये पदावर असताना निधन पावलेल्या पंतप्रधान चान सीचे उत्तराधिकारी म्हणून हुन सेन यांची नियुक्ती झाली. १९९३ च्या संयुक्त राष्ट्र पुरस्कृत निवडणुकांपर्यंत ते या पदावर होते. या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नाही आणि फुन्सिनपेक या विरोधी पक्षाला सर्वाधिक मते मिळाली. हुन सेन यांनी हा निकाल स्वीकारण्यास नकार दिला. फुन्सिनपेक सोबतच्या वाटाघाटीनंतर नोरोदोम रणरिद्ध आणि हुन सेन यांनी एकत्र पहिले आणि दुसरे पंतप्रधान म्हणून काम करण्याचे मान्य केले. १९९७ मध्ये ही युती तुटली आणि सेन यांनी सत्तापालट घडवून आणून रणरिद्ध यांना पदच्युत केले. १९९८ ते २०२३ दरम्यान हुन सेन यांनी सीपीपीला सलग आणि अनेकदा वादग्रस्त निवडणूक विजय मिळवून दिले. त्यांच्या काळात कंबोडियाची आर्थिक प्रगती वेगाने झाली असली तरी त्यांच्यावर भ्रष्टाचार, जंगलतोड आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनाचे आरोप झाले आहेत. २०१३ च्या निवडणुकीत विरोधी पक्ष प्रबळ झाल्यामुळे हुन सेन आणि सीपीपीचे बहुमत लक्षणीयरीत्या घटले. मतदानातील गैरप्रकारांच्या आरोपांमुळे देशव्यापी सरकारविरोधी निदर्शने झाली. २०१८ मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने मुख्य विरोधी पक्ष विसर्जित केल्यानंतर झालेल्या एकतर्फी निवडणुकीत ते सहाव्या आणि शेवटच्या टर्मसाठी निवडून आले. या निवडणुकीत सीपीपीने नॅशनल असेंब्लीच्या सर्व जागा जिंकल्या. त्यांनी कोव्हिड-१९ महामारी आणि कंबोडियाच्या तिसऱ्या आसियान अध्यक्षपदाच्या काळात देशाचे नेतृत्व केले; आणि २०२३ च्या निवडणुकीनंतर औपचारिकपणे आपला मुलगा हुन मानेटला पुढे करीत पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यांनी पक्षाचे नेतृत्त्व आपल्याकडेच ठेवले आणि २०२४ मध्ये त्यांची सेनेटचे अध्यक्षपद घेतले. त्याद्वारे देशाच्या राजकारणावरील त्यांचा प्रभाव कायम राहिला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →