सोनरंगी तांदूळ

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

सोनरंगी तांदूळ

सोनरंगी तांदूळ (इंग्लिश: Golden Rice) हा जैविक प्रक्रियेने (जैवतंत्रज्ञान) निर्माण केलेला तांदळाचा एक प्रकार आहे. या तांदळाचा रंग पिवळा असून याचे खास वैशिष्ट्य म्हणजे या तांदळाचा भात खाणाऱ्या माणसाला अ-जीवनसत्त्वाचा पुरेशा प्रमाणात पुरवठा होईल. गरीब कुटुंबातील माणसांना त्यांच्या आहारात भाज्या आणि फळे यांचा अंतर्भाव करणे परवडत नाही त्यामुळे गरीब कुटुंबातील माणसांमध्ये अ-जीवनसत्त्वाचा अभाव ही बाब सार्वत्रिक पातळीवर दिसून येते. इ.स. २००५ साली जागतिक पातळीवर १९ कोटी लहान मुले, १.९ कोटी गर्भवती स्त्रिया अ-जीवनसत्त्वाच्या संदर्भात अभावग्रस्त असल्याचे निदर्शनास आले होते. दरवर्षी सुमारे २० लाख लोक अ-जीवनसत्त्वाचा पुरवठा न झाल्यामुळे मृत्युमुखी पडतात आणि पाच लाख लोकांना कायमचे अंधत्व येते. या सोनरंगी तांदळामुळे या सगळ्या समस्या दूर होण्याची शक्यता आहे. नव्या प्रकारचा सोनरंगी तांदूळ हा खाण्यासाठी निर्धोक आहे याची खातरजमा अमेरिकेतील नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्स, अमेरिकन मेडिकल असोसिएशन, जागतिक आरोग्य संघटना आणि फिलिपाईन्स नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थांनी केलेली आहे.

आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था (ईरी) व तांदूळ संशोधन संस्था फिलिपाईन्स यांनी बिल व मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या आर्थिक मदतीतून ‘अ’जीवनसत्त्वयुक्त तांदळाचे संशोधन १९९३ पासून हाती घेतले होते. अविकसित व विकसनशील देशात लहान मुलांना रातांधळेपणा येतो. गोवरसारख्या आजाराला ही मुले बळी पडतात. ‘अ’जीवनसत्त्वाच्या अभावी अनेक मुलांचा मृत्यू होतो. त्यामुळे त्यांना ‘अ’ जीवनसत्त्व मोठय़ा प्रमाणात मिळवून देणारा तांदूळ जनुक अभियांत्रिकीच्या साहाय्याने विकसित करण्याचे संशोधन हाती घेण्यात आले होते. जनुक अभियांत्रिकी पद्धतीने बनविलेला हा तांदूळ सोनेरी रंगाचा असल्याने त्याला ‘गोल्डन राईस’ (सोनरंगी तांदूळ) असे नाव देण्यात आले. या तांदळाला ग्रीनपीस तसेच पर्यावरणवादी अनेक संघटनांनी विरोध दर्शविला. ईरी संस्थेत लावण्यात आलेल्या तांदळाची रोपे उपटून टाकण्यात आली. तरीदेखील संस्थेने संशोधन सुरूच ठेवण्यात आले.

‘ग्रीनपीस’सह अनेक संघटनांनी विरोध केल्यानंतरही अमेरिकी अन्न व औषध प्रशासनाने ‘गोल्डन राईस’ या सोनेरी रंगाच्या तांदळाला तो अपायकारक नाही तर गुणकारक आहे, असे प्रशस्तिपत्र दिले आहे. फिलीपाईन्स सरकारने गोल्डन राईसच्या लागवडीला यंदा ( साली) परवानगी दिली आहे, असे असले तरी जनुकबदल तंत्रज्ञानाच्या पिकांच्या चाचण्या व लागवडीला भारतात बंदी आहे. त्यामुळे हा तांदूळ लगेच अधिकृतपणे भारतात येणार नाही पण इतर मार्गाने तो येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गोल्डन राईस हा ओरायझा सटायव्हा या उपगटातील वाण आहे. तो जनुकीय अभियांत्रिकी तंत्राने १९९९मध्ये तयार करण्यात आला. त्यात दोन जनुकांचा समावेश केल्याने बिटाकॅरोटिन तयार होते. ते ‘अ’ जीवनसत्त्वाची निर्मिती करते. अशाप्रकारे जनुक अभियांत्रिकीचा वापर करून ‘अ’ जीवनसत्त्वयुक्त गोल्डन राईस हा तांदूळ तयार करण्यात आला आहे.

अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने या तांदळाची तपासणी करून त्यास मान्यता दिली. ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, फिलिपाईन्स या देशांतील अन्न व औषध प्रशासनाने त्याची तपासणी केली. हा तांदूळ आरोग्याला हानिकारक नाही. तर पोषक आहे, असा निष्कर्ष या संस्थांनी काढला. त्यानंतर फिलिपाईन्स सरकारने या तांदळाच्या लागवडीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. बांगलादेश व चीनमध्येही गोल्डन राईसला परवानगी दिली जाणार आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार २६ देशातील सुमारे चाळीस कोटी लोकांमध्ये ‘अ’ जीवनसत्त्वाची कमतरता आहे. त्यामुळे दरवर्षी पाच लाख मुलांना रातांधळेपणाचा आजार होतो. तर दहा लाख मुले मरण पावतात. ‘अ’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे शरीरात कॅल्शियम योग्यप्रमाणात रहात नाही. त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. एरवी हे जीवनसत्त्व दूध व मांसाहारातून मिळते. आता ते गोल्डन राईसमधूनही उपलब्ध होणार आहे.

गोल्डन राईसच्या निर्मितीत डॉ. पीटर बेयर, डॉ. पॅट्रिक मूर, डॉ. अजेय कोहली यांच्यासह अनेक शास्त्रज्ञांचा सहभाग आहे. आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था (ईरी) या संस्थेच्या निर्मितीत अनेक देशांचा सहभाग आहे. विशेष म्हणजे भारतही त्याचा सदस्य आहे. या संस्थेचे प्रमुख म्हणून डॉ. स्वामीनाथन यांनी काम पाहिले आहे. असे असूनही भारतात गोल्डन राईसला परवानगी नाही.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →