सिद्धेश्वर वर्मा (३ नोव्हेंबर, १८८७ – १७ ऑगस्ट १९८५) हे एक भारतीय भाषातज्ज्ञ होते. त्यांचा जन्म रावळपिंडीमध्ये (पाकिस्तान) झाल्यामुळे त्यांचे लहानपणीचे नाव पिंडीदास होते. त्यांचे वडील रामदास नंदा व आई जमनादेवी होते. त्यांनी रावळपिंडी येथे उर्दूमधून शालेय शिक्षण आणि बी.ए.पर्यंतचे शिक्षण घेतले व नंतर ते लाहोरच्या पंजाब विश्वविद्यालय येथून १९११ मध्ये इतिहास विषय घेऊन एम्.ए. झाले. १९१३ मध्ये ते ‘‘शास्त्री’‘ झाले आणि १९२७ मध्ये त्यांनी लंडन विद्यापीठाची डी.लिट्. पदवी मिळविली. १९०६ मध्ये केशवदेव शास्त्रींकडून ते संस्कृत शिकले व १९२४ मध्ये लंडन येथे राल्फ लिली टर्नर व डॅनियल जोन्स, तसेच पॅरिसमध्ये झ्यूल ब्लॉक यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वनिविद्येचा अभ्यास केला. तमिळ व भोट या भाषांचा अभ्यास त्यांनी वयाच्या साठाव्या वर्षी केला. त्यांनी १९१५ मध्ये पाकिस्तानमधील गुजराणवाला येथील हिंदू हायस्कूलमध्ये काही काळ अध्यापन केले. १९४३ पर्यंत त्यांनी प्रिन्स ऑफ वेल्स कॉलेज (नंतरचे गांधी मेमोरियल कॉलेज), जम्मू येथे अध्यापन केले. पुढे १९४३ व १९८५ या काळात विश्वेश्वरानंद वैदिक शोध संस्थान, होशियारपूर येथे विनावेतन सल्लागार म्हणून काम केले. १९५२ पासून १९६० पर्यंत केंद्रीय हिंदी निदेशालय, दिल्ली येथे बृहद् पारिभाषिक शब्दसंग्रहाचे मूळ संपादक, तसेच १९६० ते १९७२ पर्यंत चंडीगढमधील शब्दब्रह्म परिषद व संमनन मंडळाचे ते संस्थापक होते. हैदराबादहून प्रकाशित उर्दू एन्सायक्लोपीडियाचे ते एक मानद संपादक होते.
त्यांनी आपल्या आयुष्यातील जवळजवळ साठ वर्षे भाषाशास्त्राचा अभ्यास केला. त्यांनी वैदिक, संस्कृत व आधुनिक भारतीय भाषांच्या बरोबरच प्राचीन आणि अर्वाचीन युरोपीय भाषांचा अभ्यास केला. शिक्षा व प्रातिशाख्य ग्रंथांचा व वेदांची भाषा व भाषाशैली यांचा त्यांनी विशेष सखोल अभ्यास केला. आपल्या स्वाध्यायात ते व्याकरणकार पाणिनी, नाट्यशास्त्रकार भरत आणि आयुर्वेदकार चरक यांना मुनित्रय मानत. या तिघांविषयी त्यांनी शोधनिबंध लिहिलेले आहेत. आपल्या अद्भुत श्रवणशक्तीच्या साहाय्याने ते सूक्ष्म ध्वनिपरीक्षण करीत. जम्मूमध्ये अध्यापन करीत असता त्यांनी उन्हाळ्याच्या सुटीत काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील दऱ्याखोऱ्यांतून हिंडून तेथील वेगवेगळ्या २७ बोलींचा भाषावैज्ञानिक अभ्यास केला. सतत विद्यार्थी असल्याच्या भावनेने त्यांनी आधुनिक संरचनात्मक भाषाविश्लेषण अवगत करून घेतले.
त्यांचा क्रिटिकल स्टडीज इन द फोनेटिक ऑब्झर्व्हेशन्स ऑफ इंडियन ग्रॅमॅरियन्स हा डॉक्टरेटचा शोधप्रबंध १९२७ मध्ये रॉयल एशियाटिक सोसायटी, लंडन येथून प्रकाशित झाला व १९६१ मध्ये दिल्लीहून त्याचे पुनर्मुद्रणही झाले. त्याचा हिंदी अनुवाद देवीदत्त शर्मा यांची प्राचीन भारतीय व्याकरणोंके ध्वन्यात्मक विचारोंका विवेचनात्मक अध्ययन या नावाने केला (१९७३). या ग्रंथात वैदिक शिक्षा आणि प्रातिशाख्य ग्रंथ यांची चिकित्सा आली आहे.
सिद्धेश्वर वर्मा
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.