सहकारी मनोरंजन मंडळ ही परळ येथील एक नाट्यसंस्था आहे'
सन १९२० च्या काळात परळ-पोयबावाडी ह्या भागात माडांच्या वाड्या, दारूचे गुत्ते, जुगारांचे अड्डे, तमाशाची थिएटरे होती. यांच्या विळख्यात बहुजन समाज गुरफटून गेला होता.
दिवसभर कष्ट करणाऱ्या कामगारांचे जीवन सुखी होण्यासाठी जिवाला काहीतरी करमणूक पाहिजे होती. ती ज्या दर्जाची असेल त्याप्रमाणे समाजाची वृत्ती बनत असते. करमणुकीची पातळी जेवढी उच्च तेवढी समाजाची पातळी उच्च. याच दृष्टीिनातून परळ भागात एखादी चांगली नाट्यसंस्था स्थापन करून या संस्थेद्वारे कामगारांचे जनतेचे चांगल्या प्रकारे मनोरंजन, प्रबोधन करून त्यांची अभिरुची बदलण्याचा प्रयत्न करावा असे कामगार नेते कै. ना.म. जोशी यांच्या मनात होते.
याच काळात गिरगावांत राष्ट्रभूषण नाटक कंपनी होती. त्या संस्थेत गंगाराम कदम भूमिका करत असत. शिवाय 'हिंद सेवक नाट्य समाज' या नावाची एक संस्था होती. या संस्थेत शिवाजी पाटकर, द्वारकानाथ पाटील, दाजी मसुरकर, पाडावे, इत्यादी नट भूमिका करीत असत. या सर्वांच्या सहकार्याने संघाने, करीमभाई मिलमध्ये कच्ची रंगभूमी उभारण्यात आली होती व तेथे नाटके होऊ लागली होती.
'करीमभाई मिलच्या रंगभूमी'वर होत असलेल्या नाटकांमुळे ना.म. जोशी यांचा नटांशी संबंध येऊ लागला. त्यांना संघाचे इतर कार्यकर्ते पु. गो. नाईक, सहस्रबुद्धे, चित्रे, फासे, बडे, काणेकर, फणसे, यांचे सहकार्य मिळाले. या सर्व गोष्टींचा समन्वय घडून, जेव्हा परळमध्ये दामोदर हॉल बांधला गेला, त्यासुमारास दि. २० सप्टेंबर १९२२ रोजी त्या हाॅलमध्ये सहकारी मनोरंजन मंडळ स्थापन झाले. दामोदर हॉलसारखी भव्य जागा विनाभाड्याने बाराही महिने वापरण्यास मिळू लागली व कामाला सुरुवात झाली.
करीमभाई रंगभूमीवरील दुसरे नट दाजिबा परब हेही 'सहकारी मनोरंजन'मध्ये सामील झाले.
अप्पा टिपणीस यांच्या 'राधा माधव' या नाटकाने सुरुवात झाली. शिवाजी पाटकर यांनी तालीम मास्तर म्हणून काम पाहिले. विविध संस्थांच्या मदतीसाठी नाटकांचे प्रयोग केले. सहकारी तत्त्वामुळे कोणालाही मोबदला मिळत नसे, हिंद सेवक मंडळाचे सर्व नट सहकारीमध्ये सामील झाल्यामुळे त्या मंडळाच्या सामानाची किंमत ठरवून ती रक्कम ह्या सभासदांच्या भागापोटी जमा करण्यात आली.
सहकारी मनोरंजन मंडळ
या विषयावर तज्ञ बना.