चिंतामणी गोविंद पेंडसे

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

चिंतामणी गोविंद पेंडसे ऊर्फ मामा पेंडसे (जन्म : सांगली, २८ ऑगस्ट, १९०६; - १२ जनेवारी १९९१) हे मराठीतले एक अग्रगण्य नाट्य-अभिनेते होते. सांगलीच्या सिटी हायस्कूलमधून मामांनी कसबसे शिक्षण घेतले. शिक्षण अर्धवट सोडावे लागले असले तरी त्यांनी स्नेहसंमेलनांतल्या नाटकांत केलेली कामे थोरामोठ्यांच्या लक्षात आली होती. मामांचे वडील सांगली संस्थानात नोकरी करीत होते. वडील निवृत्त झाल्यावर घरची परिस्थिती बिकट झाली. वडिलांना मासिक साडेबारा रुपये पेन्शन मिळे. घरी परिवार मोठा. संसारास काही मदत करावी या हेतूने मामा पेंटरच्या हाताखालचा गडी या नात्याने वयाच्या अठराव्या वर्षी किर्लोस्कर संगीत मंडळीत शिरले. लहानपणापासून पेंटिंगची आवड होतीच. नाटकांतील पडदे रंगवणाऱ्या शंकरराव गायकवाडांकडून पेंटिंगचे धडे घ्यावे व नंतर स्वतंत्र पेंटिंगचा व्यवसाय सुरू करावा हा मामांचा उद्देश होता. शिवाय नट व्हायला वडिलांनी परवानगीही दिली नव्हती. नट म्हणजे अशिक्षित, दुराचारी व व्यसनी माणूस अशी तेव्हाची समजूत. मराठी नाटकाच्या जन्मापासून नट मंडळी मिळाली ती आचारी, ताक घुसळणारा, पाणक्या यांसारखी. त्यांच्याबरोबर त्यांची व्यसनेही नाटक मंडळीत शिरली. स्वतःला साळसूद म्हणवणाऱ्या प्रतिष्ठित लोकांनी ही नटांची व्यसने पोसली व त्यांचा गवगवाही केला. “जो नाटकात स्त्रीपात्र पाहील त्याला सात जन्म स्त्रीत्व प्राप्त होईल ” असाही एक लोकापवाद होता. त्या स्त्रीपात्राला काय शिक्षा होती देव जाणे ! अशा या प्रतिष्ठा नसलेल्या व्यवसायात सामील व्हायला वडिलांनी नाकारले नसते तरच नवल. म्हणून मामांनी नाटकांचे बोर्ड रंगवायला सुरुवात केली. ते करताकरता मामांना नाटकांत काम करायची संधी मिळाली. मामांचा दुधाचा व्यवसायही होता. केवळ नाटकांतून मिळणाऱ्या बिदागीवर संसार चालवणे शक्य नसल्यामुळे एखादा जोडधंदा असणे त्याकाळी गरजेचे होते. दुधाचा धंदा चालू असतानाच,१९३६ साली मामा पेंडसे यांनी ’रमेश नाटक मंडळी’त प्रवेश मिळवला. त्यांच्या ’आग्ऱ्याहून सुटका’ या नाटकात केलेल्या कामामुळे मामांचे नाव सर्वमुखी झाले. पुढे ’समर्थ नाटक मंडळी’, 'महाराष्ट्र नाटक मंडळी’, ललितकलादर्श अशा नामांकित नाटक कंपन्यात मामांना कामे मिळू लागली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →