त्र्यंबक सीताराम कारखानीस (जन्म : महाड, १५ एप्रिल इ.स. १८७४; - पुणे, ८ जानेवारी, इ.स. १९५६) हे एक मराठी नाट्य अभिनेते, नाट्यशिक्षक, नाट्यदिग्दर्शक आणि नाटककार होते. त्यांचे शालेय शिक्षण महाड आणि पुणे येथे झाले. मात्र कौटुंबिक अडचणीमुळी कॉलेजचे शिक्षण अर्धवटच राहिले.
पुण्यातील न्य़ू इंग्लिश स्कूलमधील शिक्षकाची नोकरी सोडून, सर्वसामान्य जनतेसमोर तेजस्वी आदर्श चांगल्या संस्कृतीचा ठसा उमटावा व त्यांच्यात वाङ्मयीन अभिरुची निर्माण व्हावी म्हणून त्र्यं.सी. कारखानीस यांनी ’महाराष्ट्र नाटक मंडळी’ स्थापन केली आणि तिच्या मार्फत ’कांचनगडची मोहना’ या खाडिलकरांच्या नाटकाचा प्रयोग त्यांनी सादर केला. नाटकात त्यांनी हंबीररावांची भूमिका केली होती. कारखानिसांनी सहकारी तत्त्वावर महाराष्ट्र नाटक मंडळी चालविली व तिला समाजात चांगली प्रतिष्ठा मिळवून दिली. ही नाटक कंपनी त्यांनी १९०४ ते १९१९ पर्यंत यशस्वीपणे चालविली.
त्यानंतर गडकरी, देवल औंधकर, खरे इत्यादी नामवंत नाटककारांची पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक अशा विविध स्वरूपांची सोळा नाटके कारखानिसांनी रंगभूमीवर आणली.
अनेक नाटकांतून भूमिका करत असताना आपण काहीतरी वेगळे करावे असे त्यांना वाटे. आपल्याला ज्या प्रकारची भूमिका करावयाची आहे, त्याप्रकारची भूमिका असलेले नाटक कुणीतरी लिहावे आणि आपण ती भूमिका सर्व ताकदीनुसार दमदारपणे रंगमंचावर सादर करावी असे त्यांना वाटे. पण त्या काळी नाट्यकलेचा पुरेसा विकास झाला नसल्याने कारखानिसांची ती इच्छा पूर्ण होऊ शकत नव्हती. शेवटी आपणच तसे नाटक लिहावे, या विचाराने ते नाटककार झाले. ’राजाचे बंड’ हे त्यांचे वेगळ्या प्रकारचे पहिले नाटक खूप गाजले. त्या यशानंतर त्यांनी अनेक नाटके लिहिली आणि रंगभूमीवर यशस्वी करून दाखवली.
त्र्यं.सी. कारखानीस
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?