जयंत सावरकर

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

जयंत सावरकर (३ मे १९३६, गुहागर - २४ जुलै २०२३) हे एक मराठी नाट्य आणि चित्रपट अभिनेते होते. वयाच्या विसाव्या वर्षी, इ.स. १९५४ साली त्यांनी आपल्या अभिनयाच्याच कारकीर्दीस सुरुवात केली.

सावरकर मूळ गुहागरचे. वडील लहानमोठा व्यवसाय करायचे. सकाळी चार वाजता उठून रोज चरकातून उसाचा हंडाभर रस काढून ते चालत चालत आरे गावापर्यंत जाऊन विकायचे. त्यांना २१ मुले होती. जयंत सावरकर सर्वात धाकटे. त्यांचा मोठा भाऊ मुंबईत नोकरी करत होता, त्याच्याकडे जयंत सावरकरांना पाठवले. ते त्याच्याबरोबर गिरगावात राहू लागले, व नोकरी करू लागले.

नोकरी सोडून जयंत सावरकर यांनी पूर्णपणे नाटकातच काम करायचे जेव्हा ठरविले तेव्हा त्यांचे सासरे नटवर्य मामा पेंडसे यांनी नोकरी सोडण्याला विरोध केला, पण अभिनयाच्या कामासाठी पूर्ण पाठिंबा दिला. सावरकरांनी सासरेबुवांचा सल्ला मानला आणि श्रद्धा व निष्ठेने रंगभूमीची सेवा सुरू केली.

सुरुवातीची बारा वर्षे सावरकर यांनी ‘बॅक स्टेज आर्टिस्ट’ म्हणून काम केले. त्याच वेळी ते नोकरीही करत होते. नाटकाची आवड होतीच. हौशी नाट्यसंस्थांमधून त्यांनी सुरुवातीला लहानसहान कामे केली. मुंबई मराठी साहित्य संघात स्वयंसेवक, कार्यकर्ता म्हणूनही काही काळ काम केले. पुढे साहित्य संघाच्या नाट्य शाखेत त्यांचा प्रवेश झाला. साहित्य संघात होणाऱ्या सर्व नाटकांच्या प्रयोगांना त्यांची हजेरी असायची. साहित्य संघाच्या दरवाज्यावर उभे राहून ते तिकिटे कापत. आचार्य अत्रे लिखित आणि पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ‘किंग लिअर’ (सम्राट सिंह) या नाटकात त्यांना मा. दत्ताराम यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली. नाटक फारसे चालले नसले तरी त्यांनी साकारलेल्या ‘विदूषक’ या भूमिकेचे कौतुक झाले.

मा. अनंत दामले ऊर्फ नूतन पेंढारकर, केशवराव दाते, जयराम शिलेदार, मा. दत्ताराम, दादा साळवी, नानासाहेब फाटक, पंडितराव नगरकर, परशुराम सामंत, बाळ कोल्हटकर, भालचंद्र पेंढारकर, रमेश देव, राजा परांजपे, रामदास कामत, सुरेश हळदणकर, ते आजच्या पिढीतील अद्वैत दादरकर, मंगेश कदम यांच्याबरोबर त्यांनी काम केले आहे. कमलाकर सारंग, दामू केंकरे, भालचंद्र पेंढारकर या जुन्या दिग्दर्शकांबरोबर कामे केल्यानंतर अद्वैत दादरकर, चंद्रकांत कुलकर्णी, मंगेश कदम, समीर विद्वांस अशा नव्या पिढीतल्या दिग्दर्शकांबरोबरही त्यांनी कामे केली आहेत.

जयंत सावरकर यांनी शंभरहून अधिक मराठी आणि तीसहून अधिक हिंदी चित्रपटांत कामे केली आहेत. वयाच्या पंचाहत्तरीनंतर त्यांनी हिंदी चित्रपटांत कामे करायला सुरुवात केली. अजय देवगण, इरफान खान, जॉन अब्राहम यांसारख्या तरुण कलाकारांबरोबर त्यांना कामे करायला मिळाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →