मास्टर दत्ताराम

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

मास्टर दत्ताराम वळवईकर( वळवई १० जून १९१६; - वसई १२ जून १९८४) हे मराठी नाटकांत काम करणार मोठे अभिनेते व नाट्यदिग्दर्शक होते. त्यांचा जन्म वळवई या गोव्यातील खेड्यात झाला. विष्णूपंत बोरकर त्या काळी वळवई येथे नाटके करीत. त्यांनी दत्तारामांना नट म्हणून व माणूस म्हणून घडवले. मा. दत्तारामांचे ते मित्र, तत्त्वज्ञ व मार्गदर्शक होते आणि दत्तारामबापूंनीही त्यांना अखेरपर्यंत पित्याचा मान दिला.

वयाच्या ९व्या वर्षी मास्टर दत्ताराम यांनी नाटकांच्या ओढीने घर सोडले, आणि ’कुंजविहारी’ नाटकात पेंद्याची विनोदी भूमिका करून रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले. ते गोव्यामधील प्रभात संगीत मंडळी’मध्ये पोहोचले. तेव्हा तिथे जुन्या मराठी संगीत नाटकांचा जमाना चालू होता. पण म्हणावी तशी नाटके चालत नव्हती. या स्थित्यंतरातून मा. दत्ताराम यांचे अभिनयकौशल्य कसाला लागून मान्यता पावले. अभिनयामध्ये व दिग्दर्शनामध्ये नव्या-जुन्या दोन्ही शैलींचा सुयोग्य वापर ते करू लागले. मास्टर गंगाराम व मा. दत्ताराम हे दोन वळवई येथील अभिनेते रंगभूमी गाजवू लागले.

जुन्या तालीममास्तरांचा पगडा दत्तारामांवर अधिक असला तरी, नव्या अभिनयशैली त्यांनी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. जुन्या नव्यांचा एक अपूर्व संगम त्यांच्या रंगशैलीत होता. प्रा. कमलाकर सोनटक्के यांनी दिग्दर्शित केलेल्या 'रक्त नको मज प्रेम हवे' या नाटकात अभिनय करताना त्यांनी आपला जुन्या नाटकातील अभिनय किंचितसा बाजूला ठेवून, ते नव्या अभिनयाला सामोरे गेले. तर 'कौन्तेय' आणि 'वैजयंती' या नाटकाच्या दिग्दर्शिका दुर्गा खोटे यांच्या दिग्दर्शनाखालीही त्यांनी तितकाच समर्थ अभिनय करून दाखवला. सखारामपंत बर्व्यांपासून ते पुरुषोत्तम दारव्हेकर आणि केशवराव दातेपासून ते चिंतामणराव कोल्हटकरांपर्यंतच्या दिग्दर्शकांच्या दिग्दर्शनाखाली काम करून तेवढ्याच ताकदीचा अभिनय त्यांनी करून दाखवला.

उमेदीच्या काळात गोव्यातील नाटकांत अभिनय करून वयाच्या २२ व्या वर्षी मास्टर दत्ताराम मुंबईत लालबागला वास्तव्यास आले. लालबागमधील गणेशगल्लीतील हरदास मथुरादास चाळ नं. ४२, खोली नं. २२ हा त्यांचा पत्ता. तेव्हा दत्तारामच ख‍ऱ्या अर्थाने 'लालबागचा राजा' होते. त्यांच्या अभिनयामुळे सर्व लालबाग त्यांच्या प्रेमात होते. सकाळी उठून लालबाग मार्केटमधून पिश‍वीतून मटण, मासे, भाजीपाला इ. आणायचे काम ते स्वतःच करीत. वर्षाचे बारा महिने ते थंड पाण्याने आंघोळ करायचे. त्यांची आंघोळ अर्धा ते पाऊण तास चालायची. आंघोळ करताना त्या रात्री होणाऱ्या नाटकांचे संवाद जोरजोरात बोलणे चालू असायचे. लालबाग गणेशगल्ली येथील 'महाराष्ट्र सेवा मंडळा'चा नळसुद्धा दुपारी दत्तारामबापूंसाठी रिझर्व्ह असायचा. ते आंघोळ करून जाईपर्यंत दुसरा कुणीही आंघोळ करण्यासाठी तिथे येत नसे.

लालबागमध्ये आल्यावर परळच्या 'दामोदर हॉल' मध्ये त्यांची नाटके व्हायची. तिथे दत्तारामांच्या भूमिका पाहून गिरगांवातील साहित्यसंघाच्या नाटकांसाठी त्यांना बोलवणे आले. साहित्यसंघाच्या ’कौन्तेय’, ’दुसरा पेशवा’, ’भाऊबंदकी’ , ’वैजयंती’ , ’राजकुमार’ यांसारख्या नाटकांत नटवर्य नानासाहेब फाटक, दुर्गा खोटे, मामा पेंडसे यांसारख्या बुजुर्ग अभिनेत्यांबरोबर तोडीस तोड भूमिका करून दत्तारामांनी 'नटवर्य' हे बिरुद मिळवले. पुढे 'ललितकलादर्श'च्या 'दुरितांचे तिमिर जावो', 'पंडितराज जगन्नाथ', 'पडछाया' या नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या.

मास्टर दत्ताराम यांनी तर नव्या दमाचे अभिनेते/अभिनेत्री डॉ. काशीनाथ घाणेकर, कृष्णकांत दळवी, रमेश देव, सीमा, श्रीकांत मोघे आणि पुढे सुप्रसिद्ध झालेल्या दिग्दर्शिका व अभिनेत्री विजया मेहता यांना नाट्यदिग्दर्शन केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →