श्रीपाद महादेव माटे (जन्म : विदर्भातील शिरपूर, २ सप्टेंबर, १८८६ - २५ डिसेंबर, १९५७) हे मराठी लेखक होते. एम.ए.पर्यंत शिक्षण घेणाऱ्या माटे यांना रँगलर परांजपे, वासुदेवराव पटवर्धन, देवधर यांच्यासारखे गुरू अध्यापक म्हणून लाभले. लोकमान्य टिळक, संस्कृत पंडित वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता. ते माटे मास्तर म्हणून ओळखले जात.
साताऱ्यातील आणि पुण्यातील ‘न्यू इंग्लिश स्कूल’मधून काही काळ अध्यापन केल्यावर माटे यांनी पुण्याच्या एस.पी. कॉलेजात इंग्रजी व मराठी विषयांचे प्राध्यापक म्हणून काम सुरू केले. ‘रोहिणी’ या मासिकाचे माटे पहिले संपादक. यानंतर ‘केसरी प्रबोध’, ‘महाराष्ट्र सांवत्सरिक’ (तीन खंड) या ग्रंथांचे संपादन करून माटे यांनी साहित्य क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले. ‘विज्ञानबोध’ या त्यांनी संपादित केलेल्या ग्रंथाची त्यांनीच लिहिलेली २०० पानी प्रस्तावना खूप गाजली. विज्ञानयुगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या प्रस्तावनेतून त्यांनी दिला.
माटे यांनी आयुष्यभर अस्पृश्योद्धाराचे काम केले.
प्रासादिक, प्रसन्न, शैलीदार माटे हे विसाव्या शतकाच्या प्रथमार्धात कसदार व विपुल लेखन करणाऱ्यांपैकी एक होते. शिक्षक, कृतिशील सुधारक, नितळ-निर्व्याज 'माणूस' ही गुणविशेषणे त्यांना सार्थपणे लावली गेली.त्यांच्या आयुष्यातील लेखनपर्व तसे उशिरा सुरू झाले, पण एकदा सुरू झाल्यावर वीस वर्षे ते लिहीत राहिले. दहा हजारांहून जास्त भरतील इतकी छापील पृष्ठे त्यांच्या खात्यावर जमा आहेत. लेखनकाळ १९३० ते १९५५. संशोधन, संकलन, चरित्रे, वैचारिक, तत्त्वचिंतनात्मक, इतिहासमंथन, चालू घडामोडी, निबंध, ललितलेख... असा प्रचंड मोठा पट या लिखाणाचा आहे.
पक्षिकेचा वारा ही त्यांची एकमेव कादंबरी.
श्रीपाद महादेव माटे
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.