शोले हा भारतामधील हिंदी भाषिक चित्रपटांच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी मानला गेलेला चित्रपट आहे. हा चित्रपट १९७५ साली प्रदर्शित झाला. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमामालिनी, संजीव कुमार व अमजदखान यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर अनेक टीकाकारांना तोंड द्यावे लागले त्यामुळे पहिल्या काही आठवड्यात या चित्रपटाला फ्लॉप चित्रपटाचा शिक्का बसला. परंतु जे प्रेक्षक हा चित्रपट पाहून आले, ते भारावून गेले व कर्णोपकर्णी प्रसिद्धीमुळे या चित्रपटाकडे लोक वळले व पाहता पाहता इतिहास घडला. मुंबईच्या मिनर्व्हा चित्रपटगृहात हा तब्बल २८६ आठवडे, म्हणजे ५ वर्षे ६ महिने, तळ ठोकून होता. उत्पन्नाचे त्या काळातील सर्व विक्रम या चित्रपटाने मोडले व आजच्या काळातील चलनवाढीचे गणित लक्षात घेतल्यास या चित्रपटाचे उत्पन्न २३६ कोटी ४५ लाख रुपये इतके होते. हा आजच्या काळातही विक्रम आहे. अजूनही हा चित्रपट एखाद्या चित्रगृहात लागला की तो बघायला प्रेक्षक गर्दी करतात, हे याचे वैशिष्ट्य आहे. चित्रपटाने नुसतेच उत्पन्नाचा विक्रम केला नाही, तर जनमानसात या चित्रपटाचे संवाद रुळले आहे. 'कितने आदमी थे', 'पचास पचास कोस जब बच्चा रोता है तब उसकी मां उसे ’'बेटा चुप हो जा नही तो गब्बर आ जायेगा’' ' असे अनेक संवाद हिंदी प्रेक्षकांच्या बोलीमध्ये म्हणी-वाक्प्रचारांसारखे रुळले आहेत. या चित्रपटाने आता पाठ्यपुस्तकात प्रवेश केला असून लहान मुलांना या चित्रपटाची महती सांगितली जाते. बी.बी.सी.ने या चित्रपटाची शतकातील एक सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवड केली, तर फिल्मफेर नियतकालिकाने त्यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात '५० वर्षांतील सर्वोत्कृष्ट चित्रपट' म्हणून या चित्रपटाला गौरविले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शोले (चित्रपट)
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.